मळणगाव : कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव हद्दीत बोरगाव–योगेवाडी रस्त्यालगत असलेल्या म्हैसाळ कालव्यात शीतपेयांच्या हजारो बाटल्या अज्ञातांनी फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. कालव्यामध्ये बाटल्या तरंगताना दिसताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारामुळे संताप व्यक्त करत माजी उपसरपंच नामदेव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी स्वतःहून कालव्यातील बाटल्या बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अलीकडेच राज्यभर निकृष्ट व संशयास्पद अन्नपदार्थ आणि शीतपेयांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित कारवाईच्या धास्तीने विक्रीस अयोग्य अथवा संशयित साठा अज्ञातांनी कालव्यात फेकून दिला असावा, अशी शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मोठ्या प्रमाणात बाटल्या फेकून दिलेल्या असल्याने स्वच्छता मोहिमेसाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.