More than One lakh Without student uniform
जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी गणवेशाविना Pudhari File Photo
सांगली

तेरा दिवसांनंतरही विद्यार्थी गणवेशाविना

पुढारी वृत्तसेवा

सांगली : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तेरा दिवस लोटले. मात्र जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांपेकी केवळ 10 हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला आहे. त्यामुळे आजही 1 लाख 15 हजार विद्यार्थी गणवेशाविना आहेत. जिल्ह्यात केवळ मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुक्यातील काही शाळेत गणवेश वाटप करण्यात आले.

शासनाने ‘एक राज्य एक गणवेश’ या धोरणाचा अवलंब करण्याचे निश्चित केले. त्यानुसार समग्र शिक्षा अंतर्गत या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये 1 ली ते 8 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना गणवेश मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली. मात्र अपवाद वगळता सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. त्यामुळे पालकांतून तीव्र भावना व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील 1 लाख 26 हजार विद्यार्थ्यांना सुमारे 2 लाख 52 हजार गणवेशांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र गणवेश शिलाईसाठी कापड वेळेत उपलब्ध झाले नाही. मे महिन्याच्या अखेरीस केवळ मिरज तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कापड आले. तसेच जूनच्या सुरुवातीला 9 तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी कापड आले. जिल्ह्यात सुमारे 2 लाख 52 हजार गणवेशांपैकी केवळ 1 लाख 25 हजार गणवेशांसाठी कापड आले आहे.

मात्र तेही वेळेत आले नसल्याने वेळेत शिलाई पूर्ण झाली नाही. जिल्हास्तरावर या गणवेशाची शिलाईची जबाबदारी स्थानिक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या महिला बचत गटांना देण्यात आली आहे. या बचत गटांनी 38 हजार गणवेशांची शिलाई पूर्ण केली आहे. त्यापैकी 10 हजार गणवेशांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात 1 लाख 15 हजार विद्यार्थी गणवेशाची प्रतीक्षा करीत आहेत.

असा असणार गणवेश

प्रत्येकी विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्यात येणार आहेत. त्यापैकी एक गणवेश स्काऊट व गाईडशी अनुरूप असेल. इतर गणवेश आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळी हाफ, फूल पँट व मुलींना आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट. तसेच 8 वीच्या मुलींना सलवार, कमीज देण्यात येणार आहे.

तालुक्याला आले कापड ; शिलाई होणार कधी ?

विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या दोन्ही गणवेशाची जबाबदारी स्थानिक महिला आर्थिक विकास महामंडळावर देण्यात आली होती. मात्र झालेल्या गोंधळामुळे एक गणवेश या मंडळाकडे आणि दुसरा गणवेश शाळा व्यवस्थापन समितीकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाला कापड तालुकास्तरावर प्राप्त झाले आहे. मात्र अजून वितरणाची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे वितरण होणार कधी आणि शिलाई होणार कधी?

SCROLL FOR NEXT