Sahyadri wildlife: सह्याद्रीत आज तिसरी वाघीण दाखल होणार File Photo
सांगली

Sahyadri wildlife: सह्याद्रीत आज तिसरी वाघीण दाखल होणार

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नागलवाडी परिसरातून जेरबंद

पुढारी वृत्तसेवा
आष्पाक आत्तार

वारणावती : प्रथम चंदा, त्यानंतर तारा यांच्यापाठोपाठ आता लाडो नावाची तिसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल होणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित होणारी ‌‘लाडो‌’ ही आता तिसरी वाघीण ठरणार आहे.

14 नोव्हेंबर 2025 रोजी ‌‘चंदा‌’ ही वाघीण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आली. तिने आता सह्याद्रीत आपले बस्तान बसवले आहे. सह्याद्रीतील सेनापती या वाघाशी तिची जोडी जमली आहे. या दोघांच्या एकत्रित वावरामुळे त्यांचे मीलन झाल्याची शक्यताही वन्यजीव विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर चांदोलीत दाखल झालेली दुसरी तारा वाघीण 8 डिसेंबर 2025 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आली. सह्याद्रीतील वाघांच्या वंशवृद्धीसाठी ऑपरेशन ताराअंतर्गत आठ वाघ सह्याद्रीत सोडले जाणार आहेत. त्यात पाच मादी वाघ आणि तीन नर वाघांचा समावेश आहे. पैकी चंदा आणि तारा या दोन वाघिणी दाखल झाल्या आहेत.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पेंच व्याघ्र प्रकल्पातून तिसऱ्या वाघिणीला नेण्यासाठी तयारी सुरू होती. ही वाघीण आधीच गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिचे स्थलांतर पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर ‌‘लाडो‌’ या नावाने ओळखली जाणारी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अधिक अनुकूल, तरुण व निरोगी असल्याचे लक्षात आल्याने तिच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, गुरुवारी रात्री पेंच व्याघ्र प्रकल्पातून ‌‘लाडो‌’ या नावाने प्रसिद्ध असलेली वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने रवाना झाली होती, शुक्रवारी रात्री ती सह्याद्रीत दाखल झाली. सह्याद्रीत दाखल होणारी ही तिसरी वाघीण सुमारे चार वर्षांची असून ही वाघीण पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नागलवाडी परिसरातून जेरबंद करण्यात आली आहे. तब्बल 850 किलोमीटरहून अधिकचा प्रवास करून ही वाघीण आज, शनिवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना वन्यजीव अभयारण्यात रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT