सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील विजयनगरमध्ये शिवदत्तसृष्टी अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा तीन फ्लॅट फोडले. सोन्या-चांदीचे दागिने व 32 हजारांची रोकड, असा एकूण 75 हजारांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अभिषेक माने हे सकाळी कुटुंबासह बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटले. लॉकरमधील एक तोळे तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने, चांदीची जोडवी असा ऐवज लंपास केला.
माने यांच्या शेजारीच माणिक पांढरे राहतात. तेही कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांचाही फ्लॅट फोडला. कपाटातील 32 हजारांची रोकड लंपास केली. पांढरे यांच्या शेजारील आणखी फ्लॅट चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. माने व पांढरे हे सायंकाळी अपार्टमेंटमध्ये आले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
संजयनगर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार दिनेश माने यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक पाचारण केले होते. मात्र श्वान अपार्टमेंट परिसरातच घुटमळले. रात्री उशिरा माने व पांढरे यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात
आले.