मळणगाव : कवठेमहांकाळ तालुक्याच्या हद्दीतील अग्रणी नदीपात्रालगतच्या गावांचा पिण्याचा प्रश्न सुटला असून म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवारी (दि.१) अग्रणी नदीपात्रात सोडण्यात आले. नदीपात्रातील १४ बंधारे भरण्यात येणार आहेत. याबाबतची मागणी आमदार रोहित आर आर पाटील यांनी मुंबई येथील विधान भवनात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या पाणीवाटप नियोजनाच्या बैठकीत केली होती.
आमदार रोहित आर आर पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.१) गव्हाण बंधा-यातून अग्रणी नदीपत्रात पाणी सोडण्यात आले. पुढील काही दिवसात कवठेमहांकाळ तालुक्याच्या ८ गावांच्या हद्दीतील नदीपात्रातील १४ बंधारे भरुन घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई येथील विधान भवनामध्ये कालवा सल्लागार समितीच्या उन्हाळी हंगामातील पाणी नियोजनाबाबत एक आढावा बैठक झाली होती. बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील द्राक्ष बागा वाचवण्यासाठी लवकरात लवकर म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करण्याची मागणी केली होती. तसेच नदीपात्रालगच्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अग्रणी नदीपात्रातील बंधारे भरून देण्याची मागणी केली होती.
अग्रणी पात्रातील सर्व बंदरे भरल्यास नदीपात्रातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १ एप्रिलपासून अग्रणी नदीपात्रातील बंधारे भरुन देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी आमदार रोहित पाटील, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतक-यांच्या उपस्थितीत गव्हाण येथील बंधा-यातून म्हैसाळचे पाणी अग्रणी नदीपात्रात सोडण्यात आले.
मळणगाव नं १ ५.०२
मळणगाव नं २ ५.७०
मळणगाव नं ३ ४.१७
शिरढोण नं १ ७.३८
शिरढोण नं २ ६.०५
तिरमलवाडी ३.०७
मोरगाव नं १ ३.१०
मोरगाव नं २ ३.६०
हिंगणगाव २.९६
विठूरायाचीवाडी नं १ ३.०९
विठूरायाचीवाडी नं २ ३.७३
विठूरायाचीवाडी नं ३ ३.०४
धुळगाव नं २ ६.५८
रांजणी ६.६२