सांगली

सांगली : ‘टेंभू’ ला तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली; विट्यात जल्लोष!

दिनेश चोरगे

विटा; पुढारी वृत्तसेवा : टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज (दि.१४) सायंकाळी नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. त्यामुळे आज विट्यातील छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष करण्यात आला. आमदार अनिल बाबर समर्थक, माजी आमदार सदाशिवराव पाटील समर्थक आणि खासदार संजय पाटील समर्थकांनी फटाके फोडून पेढे आणि साखर वाटप करून याबाबत आनंदोत्सव साजरा केला.

टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज मंजूरी देण्यात आली. त्यामुळे आता टेंभू योजनेच्या नव्या ७ हजार ३७० कोटी ३ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. परिणामी ६ व्या टप्प्यातील अ आणि पळशी उपसा सिंचन योजना, आटपाडी तालुक्यातील गावांसाठी कामथ तलावातून उताराने तसेच माण खटाव उपसा सिंचन योजनेतून तासगांव तालुक्यासाठी टप्पा क्र.६ ब मधून पाणी मिळणार आहे. यामुळे टेंभूच्या लाभक्षेत्रातील सर्वच वंचित गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

यानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज विट्यातील छत्रपती शिवाजी चौकात आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि खासदार संजय पाटील समर्थकांनी एकत्रित येत जल्लोष केला. यावेळी चौकात प्रचंड गर्दी करत समर्थकांनी घोषणाबाजी केली. यावेळी सुहास बाबर म्हणाले, आमदार अनिल बाबर यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात टेंभू योजना पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी या योजनेचा सातत्याने पाठपुरावा केला आणि आता त्याला पूर्णत्वाने यश मिळत आहे. यामुळे मतदार संघातील एकही गाव टेंभूच्या पाण्यावाचून राहणार नाही. असे म्हणत बाबर यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले, सर्वप्रथम आपण राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो, कारण इथल्या दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याचे काम या निमित्ताने होत आहे. टेंभू योजनेच्या सुरुवातीपासून ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी ही योजना पूर्ण करण्यासाठी आपापल्या परीने योगदान दिले. शिवाय इथल्या दुष्काळी जनतेने इथल्या नेत्यांवर विश्वास ठेवला तो कुठेतरी सार्थ होताना दिसत आहे. तसेच खासदार संजय पाटील यांनीही केंद्र सरकारच्या पातळीवर सातत्याने प्रयत्न करून निधी आणला आणि राज्य सरकारनेही आता तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली त्यामुळे इथली जनता कायमच या सर्वांचे ऋणी राहील, अशा शब्दांत वैभव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तर खासदार पाटील गटाचे शंकर मोहिते म्हणाले, खासदार संजय पाटील यांनी गेल्या दहा वर्षापासून सातत्याने टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी राज्य तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. टेंभूच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी खासदार पाटील सातत्याने प्रयत्नशील होते, त्यामुळे आज त्याला यश आले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT