सांगली

सांगली : ‘टेंभू’च्या विस्तारास आज मान्यता

दिनेश चोरगे

सांगली-विटा; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (गुरुवारी) टेंभू विस्तारित योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात 14 डिसेंबर 2023 हा दिवस सुवर्णदिन म्हणून नोंद होईल, असे खासदार संजय पाटील यांनी सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हीच सर्व माहिती आमदार अनिल बाबर यांनीही दिली.

या दोन नेत्यांकडून मिळालेली माहिती अशी ः सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील तब्बल 1 लाख 21 हजार 475 हेक्टर शेतीला पाणी देण्यासाठी विस्तारित टेंभू योजना मंजूर होणे आवश्यक होते. त्यासाठी लागणार्‍या 7 हजार 370 कोटींच्या खर्चास मान्यता व अतिरिक्त 8 टीएमसी पाणी यासाठी आपण सातत्याने केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

अतिरिक्त 8 टीएमसी पाणी

विस्तारित टेंभू योजनेला मान्यता मिळावी यासाठी आठ टीएमसी अतिरिक्त पाण्याची तरतूद आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या योजनांना कोणताही धक्का लागणार नाही. या योजनेअंतर्गत माण, खटावसाठी 2.5, सांगलीसाठी 4.5, तर सांगोलासाठी 1 टीएमसी पाण्याची तरतूद स्वतंत्र आहे.

5,737 कोटी रुपये

खासदार पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमधून ताकारी, म्हैसाळ योजनेसाठी 2092 कोटी रुपये, बळीराजा जलसंजीवनी योजनेमधून टेंभू योजनेसाठी 1205 कोटी रुपये व विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी 1000 कोटी रुपये, म्हैसाळ योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी जर्मन बँकेकडून 1440 कोटी रुपये अर्थसाहाय्य उपलब्ध आहे.

पाच तालुक्यांतील वंचित ; 53 गावांना लाभ

ते म्हणाले, विस्तारित टेंभू योजनेत टप्पा 'अ' व 'ब', टेंभू टप्पा 5 ची वितरण व्यवस्था, पळशी उपसा योजना यांची कामे होणार आहेत. विस्तारित टेंभू योजनेत कवठेमहांकाळ, बेवणूर व आटपाडी, कामथ तलाव उताराच्या भागाचा समावेश आहे. ज्याचा थेट फायदा खानापूरमधील वंचित 15, आटपाडीच्या 13, तासगावच्या 13, कवठेमहांकाळच्या 8, जतच्या 4 अशा 53 गावांना होणार आहे.

SCROLL FOR NEXT