इस्लामपूर. पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर व परिसरात प्लॉट - जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. प्लॉटचे दर प्रती गुंठा 10 लाखांपासून 30 ते 40 लाखांपर्यंत गेले आहेत. बड्यांनी भूखंडामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाला जागा घेऊन घर बांधणे अशक्य झाले आहे. कृष्णा - वारणा नद्यांचे वरदान लाभलेला वाळवा तालुका सधन मानला जातो. त्यामुळे तालुक्यातील जमिनींचे दर सतत चढेच राहिले आहेत. जमिनीचा दर प्रती गुंठा लाखांपर्यंत पोहोचला आहे. इस्लामपूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही जागांचे दर 7 ते 10 लाखांवर गेले आहेत.
इस्लामपूर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे पदवीपासून ते अभियांत्रिकी, वैद्यकीय असे उच्च शिक्षण देणार्या नामवंत संस्था आहेत. स्पर्धा परीक्षांचे धडे देणारी अनेक केंद्रेही येथे आहेत. शिवाय साखर कारखाना, सहकारी संस्था, बँका, उद्योग आहेत. त्यामुळे तालुका व बाहेरूनही अनेकांचा ओघ शहरात वाढत आहे. बाहेरून आलेले अनेकजण येथे स्थायिक होऊ लागले आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रही विस्तारले आहे.
आठ - दहा वर्षांपूर्वी 10 - 15 लाख रुपये प्रतिगुंठा असलेला जागेचे दर आता दुपटीने वाढले आहेत. सध्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी 30 ते 40 लाख रुपये तर उपनगरे व शहरालगच्या जागेचे दर 10 ते 25 लाखांपर्यंत आहेत. फ्लॅटचे दर 3 ते 6 हजार रुपये स्क्वेअर फुटांपर्यंत पोहोचले आहेत. शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे शहराचा विस्तारही चोहोबाजूंनी वाढू लागला आहे. परिणामी शहरालगच्या गावातील जागांचे दरही वाढू लागले आहेत.
गेल्या काही वर्षात अनेक भांडवलदार, राजकारणी, शासकीय अधिकारी यांनी जमिनींच्या व्यवहारात मोठी गुंतवणूक केली आहे. शहरातील व शहरालगतच्या मोकळ्या जागा आता बड्या लोकांच्या ताब्यात आहेत. पुणे - बंगळूर महामार्गालगतही अनेकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना जागाही मिळणे मुश्किल झाले आहे. त्यातच खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अनेक एजंट सक्रिय आहेत. त्यामुळे जागा घेऊन घर बांधणे शक्य नसल्याने अनेकांचे घराचे स्वप्न अधुरेच राहत आहे.