सांगली : प्रस्तावित नागपूर - गोवा महामार्ग हा शक्तिपीठ महामार्ग नसून दारू निर्मितीला चालना देणारा मद्यपीठ महामार्ग निर्मिती करण्याचा डाव असल्याची टीका शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी केली.
ते म्हणाले, नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग उभारणी करण्यासाठी कोणत्याही सामान्य नागरिकांनी मागणी केलेली नाही. राज्यातील जी शक्तिपीठेे आहेत, ती यापूर्वीच महामार्गावर आहेत. सर्व शक्तिपीठेे व तीर्थक्षेत्रे महामार्गांनी सध्या जोडली गेलेली आहेत. पुन्हा एकदा ती महामार्गाने जोडणे, म्हणजे शासकीय निधीचा अपव्यय आहे.
अल्पभूधारक व गरीब शेतकर्यांच्या जमिनी धनदांडग्याच्या हितासाठी काढून घेण्याचा डाव आहे. अत्यल्प मोबदला देऊन शक्तिपीठ महामार्गासाठी आराखडा व भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. कितीही दडपशाही केली तरी एक इंच जमीन न देण्याबाबतची चर्चा करून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गबाधीत क्षेत्राला वर्धा ते सिंधुदुर्ग एकसमान सरसकट कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला व ज्या ठिकाणी एमआयडीसी झोन असेल, तिथे कमीत कमी एकरी चार कोटी रुपये मोबदला व ज्या ठिकाणी या पेक्षा जास्तीचा दर आहे तिथे प्रचलित दरानुसार मोबदला देण्यात यावा.
ते म्हणाले, नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग सामान्यांच्या हिताचा नाही, धनदांडग्याच्या मद्य निर्मिती उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा महामार्ग बांधण्यात येत आहे. नागपूर परिसरातील संत्रा, मोसंबी,व द्राक्ष आदी उत्पादने परराज्यात गोवा येथे दारू निर्मिती उद्योगांना पुरवठा करण्यासाठी आणि गोव्याची उत्पादित केलेलीं दारू याच महामार्गावरील तिर्थक्षेत्रातील शहरात विक्री कराण्याचा हा राज्यकर्त्यांचा डाव आहे.