तेल दराचा आलेख घसरला आहे 
सांगली

तेल दराचा आलेख घसरला

मागणी घटली : दिवाळीनंतर डब्यामागे 100 रुपयांनी घट

पुढारी वृत्तसेवा
मृणाल वष्ट

सांगली : तेलदरात सातत्याने वाढ होत असताना आता अचानक घट झालेली आहे. त्यामुळे ग्राहकवर्गाला थोडा दिलासा मिळाला. तेल दर किलोमागे 20 रुपयांनी तर 15 किलोच्या डब्यामागे 100 रुपयांनी घटला आहे. मागणीतली घट आणि मंदीमुळे खाद्यतेलांचे दर कमी होण्याची चिन्हे आहेत.

नव्या वर्षात तेलदरात वाढ होण्याची शक्यता तेल व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. सध्या पामतेलावर आयात कर वाढल्याने पामतेलाचे दर मात्र चढे आहेत. हिवाळ्यात पामतेलाची मागणीही घटते. सरकी, सूर्यफूल, सोयाबीन तेलाची मागणी वाढते. जिल्ह्यात रोज अंदाजे 100 टन तेलाची उलाढाल होते, वर्षभरात तेल दरात 15 किलोच्या डब्यामागे सुमारे हजार रुपयांची वाढ झाली. पहिल्यांदाच तेल दर घटले आहेत. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे तेलाचा वापर थोडाफार तरी वाढतो. अवकाळी पावसामुळे तेलबियांचे घटलेले उत्पादन यामुळे तेल महागले होते. मात्र वर्षाच्या शेवटी तेलदराने थोडा दिलासा दिला. अर्थात किलो किंवा लिटरमागे दहा रुपये कमी झाल्याचे समाधान ग्राहकाला असतेच. दिवाळीनंतर लग्नसराईला प्रारंभ होतो त्यामुळे सगळ्याच तेलांची मागणी वाढते. परंतु यंदा मागणीत घटच झाली आहे.

दसरा-दिवाळीत खाद्यतेल दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली होती, आज मात्र दरात घसरण झाली आहे. 15 किलोच्या डब्यामागे आणखी घट होण्याची शक्यता असली तरी नव्या वर्षात दर वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ खरेदीत 10 रुपयांनी घट झाली आहे. दर आणखीन घटले तर ग्राहकांना दिलासा आहे. दरवाढीमुळे ग्राहक तेल खरेदीत बचत करत होते. दर कमी झाले तर खरेदीत वाढ होण्याची आशा आहे.
आदर्श हुक्किरे , तेल व्यापारी, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT