इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरुल व कारंदवाडी युनिटकडील सन 2024-25 हंगामातील उसास पहिला हप्ता 3200 रुपये प्रतिटन देणार आहे. 2024-25 मधील अंतिम दर अंदाजे 3275 रुपये अपेक्षित असून उर्वरित रक्कम दीपावलीस देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली. तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडील ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रतीक पाटील म्हणाले, राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. ठिंबक सिंचन योजना, सच्छिद्र पाईप योजना, विविध खते, जैविक खते कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांना पुरविली जात आहेत. कारखाना कार्यक्षेत्रात सहकारी पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून शेतीस पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच शेतीउपयोगी वस्तू कमी दरात शेतकर्यांना दिल्या जात आहेत. कारखाना व्यवस्थापनाने सन 2024-25 हंगामात साखराळे युनिटकडे 9 लाख 50 हजार टन, वाटेगाव- सुरुल युनिटकडे 5 लाख टन, कारंदवाडी युनिटकडे 4 लाख 50 हजार टन, तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडे 3 लाख असे एकूण 22 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, संतोष खटावकर उपस्थित होते.