सांगली

सांगली : अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा मुहूर्त पुन्हा हुकला

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राज्यभरातील मराठा समाज आंदोलनामुळे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा मुहूर्त पुन्हा हुकलाच, पण या वातावरणात संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषवणे योग्य नाही, असे म्हणत आमदार सुधीर गाडगीळ यांनी राजीनामा दिला. विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रदान सोहळाही स्थगित झाला.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या संमेलनाची मुहूर्तमेढ रंगभूमी दिनाचे औचित्य साधून 5 नोव्हेंबर रोजी सांगली येथे होणार होती, पण सध्या राज्यात सुरू असलेली परिस्थिती आणि स्थानिक प्रशासनाकडून सांगली शाखेला कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत सूचना आल्यानंतर हा मुहूर्तही पुढे ढकलण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पुन्हा एकदा होता होता थांबले. या संमेलनाची मुहूर्तमेढ रविवारी सांगलीत रोवण्यात येणार होती. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मंत्रीमहोदयांची मांदियाळी सांगलीत येणार होती. मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते. स्वागताध्यक्ष आमदार गाडगीळ यांनी घेतलेल्या बैठकीनंतर स्थानिक नियोजनाला वेग आला होता, पण आता सारेच थांबले. राज्यभरातील मराठा आंदोलनामुळे संमेलनच लांबणीवर टाकण्याचा निर्णय मध्यवर्ती संयोजन समितीने घेतला आणि विष्णुदास भावे नाट्य विद्यामंदिरच्या प्रांगणात संमेलनाचा मंडप उभा राहता राहता थांबला.

पुढची तारीख कळवू

एकंदर परिस्थिती पाहता, 100 व्या नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढ समारंभाचा कार्यक्रम नियोजित तारखांना न करता पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील तारखा चर्चा करून आपल्याला लवकरच कळविण्यात येतील, असा निरोप अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्यावतीने पत्राद्वारे देण्यात आला आहे.

भावे पुरस्कार प्रदान सोहळा स्थगित

राज्यभर आंदोलनाचे वातावरण पाहता, पाच नोव्हेंबर रोजी होणारा विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान सोहळा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला यापूर्वीच मी पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असताना, हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अशा परिस्थितीत नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषवणे योग्य वाटत नाही.
– सुधीर गाडगीळ, आमदार

SCROLL FOR NEXT