देवराष्ट्रे : आसद (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फोटो लावण्याच्या कारणावरून बुधवारी सकाळपासून गोंधळ सुरू होता. ‘संपतराव देशमुख यांचा फोटो लावा, नाहीतर बाकीचे सगळे फोटो काढा’, असा पवित्रा घेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गोंधळ घातला. याला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. हा वाद अखेर पोलिस ठाण्यात गेला, मात्र तोडगा निघाला नाही.
गुरुवारी दुपारी मतदार संघांतील सर्वच नेत्यांचे फोटो प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयातून हटविले. त्यानंतर तणाव निवळला. आसदमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिवंगत नेते संपतराव देशमुख यांचा फोटो आणून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावण्याची विनंती केली. मात्र याला काहींनी विरोध केला. दिवसभर हा वाद सुरू असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फोटो लावला. मात्र काही वेळातच तो काढण्यात आला. त्यानंतर हा वाद थेट चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यामध्ये गेला. यानंतर सर्वच फोटो काढण्यात आले.