तासगाव : वडगाव (ता. तासगाव) येथे सुरू असलेली अवैध लाकूडतोड रोखण्यात शेतकर्यांना यश आले. शेतकर्यांनी पकडलेला टेम्पो आणि लाकूड वन विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी तीनजणांविरोधात वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वनपाल सागर पतोडे व वनरक्षक दीपाली सागावकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये टेम्पो चालक सचिन बाबासाहेब बजंत्री, लाकूड व्यापारी पाशाराम बजंत्री (दोघे रा. कलोती, ता. अथणी, जि. बेळगाव) व आकाश संजय नरुटे (कलिनड, अंजूर, ता. अथणी) यांचा समावेश आहे. कारवाईत 25.520 घनमीटर लाकूड व टेम्पो जप्त केला.
वडगाव परिसरात अवैध लाकूडतोड सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. शेतकर्यांनी याबाबत अनेकदा वन विभागाला माहिती दिली होती. वडगाव परिसरात नागरिक व शेतकर्यांनी वन विभागाच्या साहाय्याने वृक्ष लागवड अभियान राबवून हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन केले आहे. या वृक्ष लागवड अभियानासाठी गावाने पुरस्कार मिळविले आहेत.
असे असताना परिसरात खुलेआम वृक्षतोड सुरू होती. रविवारी रात्री लाकडांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो गावातील नागरिक व शेतकर्यांनी अडविला. याची माहिती त्यांनी वन विभागाच्या अधिकार्यांना दिली. वनपाल सागर पतोडे व वनरक्षक दीपाली सांगावकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी लाकूड भरलेला टेम्पो (केए 28 बी 1875) व तीन संशयित मिळून आले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिली आहे, असे वनपाल सागर पतोडे यांनी सांगितले.