Sangli News 
सांगली

Sangli News : टेंभू योजनेच्या आवर्तनामुळे पिकांना संजीवनी

कडेगाव, खानापूर, आटपाडीस लाभ : संभाव्य पाणी टंचाईवर होणार मात : 240 गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव शहर : चालूवर्षी कडेगाव तालुक्यासह दुष्काळी खानापूर, आटपाडी भागात नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीप्रश्न भेडसावू लागल्याने व पाण्याची पातळी खालावली गेली आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामासाठी गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील टेंभूच्या लाभक्षेत्रातील 240 गावांतील पिकांना दिलासा मिळाला आहे. या आवर्तनामुळे उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात होणार आहे, तर शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी मागणार आहे.

सांगली जिल्ह्यात मागील काही वर्षात डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याच्या टंचाईला लोकांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी ही अशीच परिस्थिती होती. दुष्काळी तालुक्यात पाणीटंचाई व पिके पाण्याअभावी कोमेजून जाऊ लागल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी झाली. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी रब्बी हंगामासाठी टेंभूचे आवर्तन सुरू करण्यात आले. त्यामुळे पिण्याचा आणि शेती पिकांचा पाणी प्रश्न बहुतांश निकाली निघाला आहे.

या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील सुमारे 60 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकरी व पिकांनाही दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी लांबणीवर पडलेल्या आवर्तनामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईवर सरकारकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठे नुकसान होऊ लागले होते. रब्बी पिके कोमेजून जात होती. ऊस व बागायती पिकांसमोरील पाणी संकट वाढले होते, तर टेंभूच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून योजनेच्या अधिकाऱ्यांनी आवर्तन सुरू केले आहे. योजनेचा टप्पा क्रमांक 1 अ मधून कृष्णा नदीचे पाणी सोडले गेले, आणि ते टप्पा क्रमांक 1 ब मध्ये पोहोचवून खड्या उंचीवरून (61 मीटर) पाणी उचलून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी 1950 अश्वशक्तीचे 33 पंप बसवले गेले आहेत. त्यापैकी टप्पा क्रमांक 1(अ) येथील पाच व टप्पा क्रमांक 1 (ब) येथील पाच पंप सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर, हे पाणी 85 मीटर उचलून 6 महाकाय पाईपलाईनद्वारे खंबाळे बोगद्याच्या सुरवातीस पोहोचवले आहे. खंबाळे औंध बोगद्याच्या माध्यमातून मुख्य कालव्यात प्रवेश करत, पाणी कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर व पुढे हिंगणगाव बुद्रुक तलावात सोडण्यात आले आहे. सुर्ली कालव्यात पाणी सोडले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT