tembhu canal farmers compensation pudhari
सांगली

tembhu canal farmers compensation: जमिनीचा मोबदला द्या अन्यथा टेंभू कालवा बुजवणार... संतप्त शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

Anirudha Sankpal

विटा : पुढारी वृत्तसेवा

टेंभू च्या कालव्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला त्वरित द्या, अन्यथा कालवा मुजवून टाकणार असा इशारा विट्यातील सुरेश तथा सूर्यकांत बाबूराव पाटील यांनी दिला आहे.

विटा परिसरात टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. येथील विटा ते पारे रस्त्यालगत सुरेश पाटील यांची एकूण सात एकर जमीन आहे. यातील अडीच एकर जमिनीतून टेंभू योजनेचा खानापूर - तासगाव हा एकूण ४१ किलो मीटर अंतर असलेला कालवा (उघडा पाट) गेला आहे. गेल्या बारा वर्षांपूर्वी उघड्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या कालव्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यांतील सुरेश पाटील एक आहेत.

आजपर्यंत मोबदला नाही

याबाबत सुरेश पाटील म्हणाले की, विटा नगरपालिके च्या हद्दीमध्ये विटा ते पारे रस्त्यालगत आमची गट नंबर ४७३/२/३ मध्ये एकूण सात एकर जमीन आहे. या जमिनीच्या सातबारावर मी सूर्यकांत बाबुराव पाटील, नंदकुमार बाबुराव पाटील आणि नाथाजीराव बाबुराव पाटील असे सामायिक क्षेत्र आहे. यातील अडीच एकरातून टेंभूचा कुर्ली कडे जाणारा कालवा म्हणजे उघडा पाट गेलेला आहे. मात्र या गेलेल्या जमिनीचे मूल्यांकन होऊन मोबदला आम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही.

रेखांकन बदलले अन् कालवा पुढे नेला

पूर्वी आमच्या जमिनीतून कालवा जात नव्हता, त्यावेळी (सन२०१२) दैनिक पुढारीतून पारे रस्त्यालगत खानापूर तासगाव कालवा ९० अंशाने वळला आहे. परिणामी पुढे पुलाखालून पाणी वेगाने जाणार नाही, अशी अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे गडबडीत अधिकाऱ्यांनी या कालव्याचे रेखांकन (कॅनॉल अलाइनमेंट) बदलले आणि आमच्या रानातून कालवा पुढे नेला आहे. त्यामुळे आता अधिकारी म्हणत आहेत की, ते क्षेत्र तुमचे नाही, मात्र मी त्याच वेळी त्यांना ही जमीन इतर कोणाच्या नसून आमची आहे असे सांगितले होते.

आज या क्षणापर्यंत मला टेंभूच्या कार्यालयाकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. ज्यावेळी कालव्याचे अलाइनमेंट बदलली त्यावेळी मी ते काम बंद पडले होते. मात्र त्यावेळी तत्कालीन आमदार अनिल बाबर यांनी मध्यस्थ केली होती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावली होती. त्यावेळी त्यांनी मला पाटलांनी जमीन दान द्यायची असते असे म्हंटले होते. पण त्याच वेळी तुमच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देतो असेही सांगितले होते.

तर कलवा मुजवणार

त्यानंतर त्यावेळचे प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती स्थापन केली या समितीने विटा नगरपालिके च्या हद्दीत किंवा खानापूर तालुक्याच्या हद्दीत कुठेही जमीन अधिग्रहणासाठी एकरी पस्तीस हजार रुपये दर आहे असा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला.

त्यावर मी माझी जमीन जिथे आहे त्या परिसरामध्ये पाच लाख रुपये प्रति गुंठा दर सुरु असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. आम्ही आधीच अल्पभूधारक आहोत आता आमच्या जमिनीचा लवकर मोबदला मिळाला नाही तर आम्ही तो कालवा बुजवून टाकणार आहोत असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT