Teachers Protest Pudhari
सांगली

Teachers Protest: ‘टीईटी‌’सक्तीविरोधात आज मोर्चा

जिल्ह्यात शाळा बंद ठेवणार : आंदोलनाच्या निर्णयावर शिक्षक ठाम

पुढारी वृत्तसेवा

सांगली : ‌ ‘टीईटी‌’ सक्तीविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक शुक्रवारी (दि. 5 डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

दि. 5 डिसेंबररोजी सकाळी दहा वाजता विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाणार आहे. अनेक वर्षे सेवा दिलेल्या शिक्षकांनी पुन्हा टीईटी परीक्षा देणे म्हणजे जुन्या काळातील डॉक्टरांना आता पुन्हा नीट परीक्षा देण्यास सांगण्यासारखा विषय आहे. 2013 पूर्वी शिक्षणसेवेत आलेले सर्व शिक्षक पात्रता सिध्द करूनच सेवेत आले आहेत. त्यांना पुन्हा टीईटी परीक्षा द्यायला लावणे योग्य नाही. हा निर्णय लादणे चुकीचे आहे. यामुळे अनेक शाळा बंद पडतील, असा आरोप शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मोर्चासाठी आज-शुक्रवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. गुरुवारी अनेक शिक्षकांनी रजेचा अर्ज मुख्याध्यापकांकडे दिला आहे.

शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा

दरम्यान, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शाळा बंद ठेवू नयेत, असे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास एक दिवसाची वेतन कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात सरकारी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. मात्र सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यावे. आंदोलनामुळे कोणतीही शाळा बंद ठेवू नये. जर शाळा बंद ठेवली तर त्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे आदेश शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी काढले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT