सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सोमवारी गोंधळ झाला. दोन मिनिटात 16 ठराव मंजूर करण्यात आले. बहुसंख्य सत्ताधार्यांनीच ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला. अखेरपर्यंत विरोधकांना बोलण्यासाठी ध्वनिक्षेपकच न दिल्याने त्यांनी सभात्याग करून समांतर सभा घेतली. दुसरीकडे सभा शांततेत पार पडल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष संतोष जगताप होते.
सभेला सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सुरुवात झाली. सभा सुरू होण्याअगोदरच सभागृहात पुढील चार- पाच रांगांमध्ये सत्ताधारी गटाचे समर्थक येऊन बसले होते. सभा सुरू होताच विरोधक घोषणा देत एकत्रितपणे सभागृहात आले. सभेला सुरुवात झाल्यानंतर सत्ताधार्यांनी पहिली 20 मिनिटे मागील इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर 15 मिनिटे विद्यमान संचालक मंडळाच्या अभिनंदन पत्राचे वाचन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांना प्रास्ताविकासाठी 10 मिनिटे लागली. अशी सव्वा तास सभा झाली.
बँकेचे उपाध्यक्ष फत्तू नदाफ यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी लाड यांनी नोटीस वाचन व मागील इतिवृत्त वाचन केले. या गदारोळातच विरोधकांनी सभागृहात आणलेले फलक फडकवले. या फलकांवर सत्ताधारी गटाचा निषेध, विशेषतः इमारत बांधकाम व नोकरभरती या विषयांवर टीका-टिपणी होती. पुढच्या पाच-सात रांगेमधील खुर्च्यांवर बसलेले सत्ताधारी गटाचे समर्थक संचालक मंडळाच्या विजयाच्या घोषणा देत होते, तर पाठीमागील रांगेत बसलेल्या विरोधकांनी संचालक मंडळाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सचिन बामणे म्हणाले, मृत संजीवनी योजनेचे श्रेय सत्ताधार्यांनी घेऊ नये. तसेच आकृतिबंधानुसार संभाव्य नोकरभरती वाढविण्यास आमचा विरोध आहे. सुमारे सव्वातास ध्ननिक्षेपक मागून देखील तो न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला व सभागृहाबाहेर समांतर सभा घेतली.