Bribe Case Pudhari
सांगली

Sangli News : तासगाव तहसीलमध्ये लाचखोरीचे खरे लाभार्थी कोण?

वर्षात तीन घटना; तिघेही खासगी ‌‘कारभारी‌’

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव तालुक्यात एका वर्षात लाचखोरीच्या तीन घटना घडल्या. महसूल विभागातील कामाबाबत नागरिक, विद्यार्थी, पालक यांच्या अनेक तक्रारी या योग्यच असल्याचे नुकत्याच उघड झालेल्या लाचखोरीतून स्पष्ट होते. विशेषतः गेल्या वर्ष भरात महसूल विभागाच्या दोन घटना घडल्याने महसूल विभाग पुन्हा चर्चेत आला आहे.

गेल्या वर्षी तहसीलदार कार्यालयातील खनीकर्म विभागात काम करताना सेवानिवृत्त व्यक्तीला लाच घेताना पकडले होते. त्या नंतरच्या काही दिवसातच उमेदवार म्हणून कार्यरत असणारा एकजण ‌‘लाचलुचपत प्रतिबंध‌’च्या जाळ्यात अडकला. गेल्या 23 रोजी शिरगाव येथील तलाठी कार्यालयाकडे 20 वर्षे काम करीत असलेला संजय शंकर पवार हा दस्त नोंदणीसाठी दहा हजारांची लाच घेताना सापडला. तिन्ही प्रकरणात लाच घेताना जरी खासगी व्यक्ती सापडल्या असल्या तरी या मागचा बोलविता धनी कोण आहे, हे लपून राहत नाही.

गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत अनेकांची विविध कामे प्रलंबित असतात, नव्हे ती मुद्दाम ठेवली जातात, अशा नागरिक, शेतकरी यांच्या तक्रारी आहेत. कोणतेही काम वजन ठेवल्याशिवाय होत नाही याची जाणीव लोकांना झाली आहे. सात बारा नोंदी, विविध दाखले, दस्त नोंदणी, वहिवाटीचे रस्ते, पाणंद रस्ते, रेशन कार्ड (शिधापत्रिका) अशी कामे महसूल विभागात प्रलंबित ठेवली जातात. एक वर्षाच्या कालावधीत तासगाव तहसीलदार कार्यालयाशी संबंधित लाचखोरीच्या तीन घटना घडल्या असल्याने तहसील कार्यालयातील कामकाजाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासन कोमात; तस्कर मोकाट

‌‘महसूल‌’मधील लाचखोरीने तस्कराची मुजोरी वाढली आहे. शिवाय महसूलच्या प्रशासनावर राजकीय दबाब असल्याने कारवाईबाबत प्रश्नचिन्ह आहे. तालुक्यातील अनेक गावांतून मुरूम, माती, दगड तस्करी सुरू असताना याकडे महसूल आणि पोलिसांनी कानाडोळा केला आहे. याबाबत आश्चर्य व्यक्तहोत आहे. जुजबी कारवाई करून तस्करांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT