Fraud Case | तासगावात बेदाणा व्यापार्‍यांची 80 लाख रुपयांची फसवणूक File Photo
सांगली

Fraud Case | तासगावात बेदाणा व्यापार्‍यांची 80 लाख रुपयांची फसवणूक

निटिंग मशिनसाठी करार; माल विक्रीसाठी देण्याचे आमिष

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : बेदाणा निटिंग मशिनसाठी (बेदाण्याच्या आकारानुसार वर्गीकरण करणारे यंत्र) करार करून अडत दुकानात बेदाणा विक्रीसाठी देतो, असे आमिष दाखवून बेदाणा व्यापार्‍यांची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंद असणारे हे व्यापारी आहेत. या प्रकरणी बेदाणा व्यापारी अनिलकुमार पांडुरंग पाटील (वय 40, रा. विटा रस्ता, तासगाव) यांनी तासगाव पोलिसांत 15 जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे अशी : श्रीधर बसाप्पा कासार (रा. तोदलबागी, ता. जमखंडी), बसाप्पा हणमंत हुगार (रा. तोदलबागी), राजेंद्र शिवाणा रायाप्पागोळ (रा. तोदलबागी), आनंद सदाशिव बिलगली (रा. तोदलबागी), मलकारी ओडियार (पूर्ण नाव माहीत नाही) (रा. तोदलबागी), रमेश रुकमवा बसर्गी (रा. नागणूर), प्रकाश रुकमवा बसर्गी (रा. नागणूर), गोरखनाथ भगवंत कदम ( रा. नागणूर), जगदीश हणमंत हुगार (रा. तोडलबागी), रवी मादार (पूर्ण नाव माहीत नाही.) (रा. तोदलबागी), राजेश एन. गौरोजी (रा. चिखलगी), राजू सदाशिव काळे रा. तोदलबागी), संगप्पा मल्लप्पा तलवार (रा. तोदलबागी), प्रकाश दादू गुबाची (रा. तोदलबागी), रामाप्पा इट्टी (पूर्ण नाव माहीत नाही.) (रा. तोदलबागी)

संशयित श्रीधर कासार याने फिर्यादी अनिलकुमार पाटील यांचा विश्वास संपादन केला. कासारने बेदाणा निटिंग मशिनसाठी त्यांच्याशी करार केला. त्यातून मिळणारा नफा देतो, असे सांगितले. इतकेच नव्हे तर तयार होणारा बेदाणा माल तुमच्या अडत दुकानात विक्रीसाठी देण्याचे आमिषही दाखवले. असे करून त्याने 53 लाख 23 हजार 168 रूपयांची फसवणूक केली.

बेदाणा उत्पादक शेतकरी बसाप्पा हुगार याने एक लाख, राजेंद्र रायाप्पागोळ याने दोन लाख, आनंद बिलगली याने एक लाख, मलकरी ओडियार याने दीड लाख, रमेश बसर्गी याने एक लाख, प्रकाश बसर्गी याने तीन लाख, गोरखनाथ कदम याने एक लाख, जगदीश हुगार याने सहा लाख 85 हजार, रवी मादार याने एक लाख, राजेश गौरोजी याने दोन लाख, राजू काळे याने एक लाख, संगप्पा तलवार याने एक लाख, प्रकाश गुबाची दीड लाख, रामप्पा इट्टी याने दीड लाख रुपये फिर्यादी पाटील यांच्याकडून आगाऊ (अ‍ॅडव्हान्स) घेतले.

ही एकूण रक्कम 25 लाख 35 हजार रुपये होते. ही आगाऊ रक्कम घेताना फिर्यादी अनिलकुमार पाटील यांना बेदाणा त्यांच्या अडत दुकानात विक्रीसाठी देण्याची ग्वाही दिली होती. या संशयित शेतकर्‍यांनी 6 एप्रिल 2019 नंतर 22 फेब्रुवारी 2023 अखेर वेळोवेळी आगाऊ रक्कम रोख व ऑनलाईनद्वारे घेतली. मात्र त्यावेळेपासून आजअखेर फिर्यादी पाटील यांना या शेतकर्‍यांनी बेदाणा विक्रीसाठी दिला नाही. पाटील यांना बेदाणा विक्रीसाठी न देता तो परस्पर दुसरीकडे विकल्याने त्यांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गेली तीन वर्षे फिर्यादी पाटील शेतकर्‍याच्या सतत संपर्कात आहेत. पाटील यांनी अनेकवेळा संबंधित संशयित शेतकर्‍यांना बेदाणा विक्रीसाठी आणा, असे सांगूनही ते टाळाटाळ करीत होते. संशायित शेतकरी दाद देत नसल्याने शेतकर्‍यांनी फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तासगाव पोलिसांत धाव घेतली. हे सर्व संशयित शेतकरी कर्नाटक राज्यातील जमखंडी तालुक्यातील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT