तासगाव : येथे सोमवारी बेदाणा सौद्यात १५ किलोहून अधिक बेदाणा उधळला गेला.  
सांगली

Sangli News : 'त्या' व्यापाऱ्याचा परवाना तत्काळ रद्द करा

फौजदारी गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

तासगाव :आमदार रोहित पाटील यांच्या पुढाकारानंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा सौद्यावेळी बेदाणा उधळू नये, सौद्यात घेतलेला बेदाणा पुन्हा बॉक्समध्ये ठेवावा, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्याला सौद्यातून बाहेर काढण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दिले होते. मात्र, सोमवारी (दि. २४) झालेल्या बेदाणा सौद्यात एक बडा बेदाणा व्यापारी जाणूनबुजून जास्त बेदाणा उधळत असल्याचा व्हिडीओ मनसेकडून व्हायरल करण्यात आला. थेट बेदाणा सौद्यात जाऊन लाईव्ह पंचनामा केल्याने मनसेकडून संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करावा तसेच व्यापाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बाजार समितीकडे करण्यात आली आहे.

याबाबत मनसेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी बाजार समिती प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचा बेदाणा उधळून त्यांचे नुकसान केले जात असल्याने उधळण बंद करण्याच्या मागणीसाठी काळे यांनी उपोषण केले होते. उपोषण स्थगित करताना बाजार समितीचे सभापती, सचिव व संचालक मंडळाच्यावतीने बेदाणा उधळण होणार नाही, अशा आशयाचे पत्र देण्यात आले होते.

त्यानंतर बाजार समितीने सौद्यावेळी व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. सौदा सुरू असताना घेतलेला बेदाणा पुन्हा बॉक्समध्ये न टाकता, तो उधळताना कोणी आढळल्यास त्याला सौद्यातून बाहेर काढण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सोमवारच्या सौद्यात एका बड्या व्यापाऱ्याने मुद्दामहून अधिक बेदाणा उधळल्याचा आरोप करत काळे यांनी बाजार समितीच्या नियमांचीच पायमल्ली झाल्याचे म्हटले आहे.

बाजार समितीने घेतलेला निर्णय आणि आमदार पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांनंतरही नियमांचे उल्लंघन होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाची उधळण करून त्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या व्यापाऱ्याला पाठीशी घालू नये, अशी मागणी काळे यांनी केली. तसेच पुढील चार ते पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काळे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT