तासगाव प्रांत कार्यालयास हिरवा कंदील 
सांगली

Tasgaon News| तासगाव प्रांत कार्यालयास हिरवा कंदील

आमदार रोहित पाटील : मुंबईत महसूलमंत्री यांच्यासोबत बैठक; लवकरच मिळणार मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

मळणगाव : राज्य सरकारच्या ‘दोन तालुक्यांसाठी एक उपविभागीय कार्यालय’ या धोरणानुसार तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांसाठी स्वतंत्र तासगाव उपविभागीय (प्रांत) कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.

त्यांनी गुरुवारी मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तासगाव उपविभागाच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला. आर. आर. पाटील यांची तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यांचे प्रशासकीय एकत्रीकरण करण्याची संकल्पना होती. त्यानुसार २०१० मध्ये महसूल व वन विभागाने तासगाव उपविभाग निर्मितीबाबत पत्रव्यवहारही केला होता. मात्र, काही कारणांमुळे हा प्रस्ताव पुढे सरकला नाही. सध्या दोन्ही तालुक्यांचा प्रशासकीय कारभार मिरज उपविभागीय कार्यालयामार्फत चालतो. परिणामी, जमीनविषयक खटले, विविध दाखले आणि इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना नाहक मिरजला जावे लागते.

राज्य सरकारने दोन तालुक्यांसाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालयाची भूमिका स्वीकारल्यानंतर सांगली जिल्ह्यात कडेगाव आणि जत येथे नवीन कार्यालये सुरू करण्यात आली. त्याच धर्तीवर तासगाव-कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र कार्यालयाची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील १२९ गावांतील नागरिकांना सर्व प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून, मिरजला होणाऱ्या फेऱ्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT