तासगाव : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील तरुणाची 13 लाख 49 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेले प्रवीण राजेंद्र शेटे (वय 34, रा. शेटे वाडा, माधव प्रेसजवळ तासगाव) यांनी तासगाव पोलिसात दोन महिलांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. नीता जैन व ज्योती (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी संशयित महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, 21 फेब्रुवारी 25 ते 2 मार्च 26 या कालावधीत फिर्यादी शेटे तासगावमध्ये असताना संशयितांनी इंस्टाग्रामवरून नीता जैन व ज्योती (दोघींचे पूर्ण नाव माहित नाही) यांनी त्यांना समाजमाध्यमांवरील एक ग्रुप जॉईन करण्यास सांगितले. या ग्रुपमार्फत ऑनलाईन वेबसाईट प्रवीण यांना पाठविली.
फिर्यादीने त्याच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारामार्फत 8,36,200 रुपये संबंधित संशयितांच्या बँक खात्यावर पाठविले. या रकमेचा परतावा म्हणून त्यांना 44 लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. हे सर्व पैसे परत देण्याकरिता टॅक्स, सर्व्हिस व इतर चार्ज सांगून प्रवीण यांच्याकडून आणखीन पाच लाख तेहतीस हजार पाचशे पंचवीस रुपये घेतले. असे एकूण त्यांचेकडून 13 लाख 49 हजार 725 रुपये घेतले.
फिर्यादी प्रवीण यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पण त्यांनी वडील, भाऊ तसेच अन्यजणांकडून उसनवारी करून ही रक्कम संबंधित संशयितांना वेळोवेळी त्याच्या मागणीप्रमाणे दिली. मुदत संपल्यानंतर प्रवीण याने परताव्याची मागणी केली. त्यासाठी पाठपुरावा करताच त्याला ग्रुपमधून काढून टाकण्यात आले.