कवठेएकंदचा आसमंत आतषबाजीने उजळला 
सांगली

Sangli News : कवठेएकंदचा आसमंत आतषबाजीने उजळला

बारा तासाहून अधिक काळ रंगले नेत्रदीपक दारुकाम; हजारो भाविकांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे श्री सिद्धराज महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित ऐतिहासिक आतषबाजीचा उत्सव मंगळवारी भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. बारा तासाहून अधिक काळ रंगलेल्या या उत्सवात पारंपरिक दारुकामासह विविध आकर्षक देखावे सादर करण्यात आले. साठ हजारांहून अधिक भाविकांनी या नेत्रदीपक आतषबाजीचा आनंद घेतला. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीने चोख नियोजन केले होते.

श्री बिऱ्हाडसिद्ध देवालयात रात्री आठ वाजता श्रींची पूजा झाल्यानंतर पाटील कट्टा येथील शिलंगण चौकात मानकरी चव्हाण-पाटील यांच्या उपस्थितीत आपटापूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. श्री सिद्धराज महाराज आणि बिरदेव महालिंगराया यांच्या पालखीला ठिकठिकाणी आतषबाजीची सलामी देण्यात आली. 'हर हरऽऽ'च्या जयघोषात फुलांनी सजवलेली पालखी, श्रींचे अश्व, छत्र-चामर, आरती-दिवट्या, गुरव-पुजारी, देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी आणि सेवेकरी यांच्या सहभागाने सोहळ्याची रंगत वाढली.

सायंकाळी कुस्तीप्रेमींच्या पुढाकाराने मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेने उत्सवात आणखी रंग भरले. ग्रामप्रदक्षिणेदरम्यान सुवासिनी महिलांनी पालखीचे औक्षण करून श्रींचे दर्शन घेतले. देवधरे येथे पूजा झाल्यानंतर पालखी मंदिरात परतली. देवस्थान ट्रस्टच्यावतीने दारु शोभा मंडळे, मानकरी आणि सेवेकऱ्यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व त्यानंतर उत्सवाची सांगता झाली.

उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिस दल, महसूल प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि वीज वितरण विभागाने उत्तम समन्वयाने काम केले. कवठेएकंद येथील मराठा समाजाच्यावतीने प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आले होते, तसेच ॲम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी किरण अवचर, पोलिस निरीक्षक विशाल टकले व तहसीलदार अतुल पाटोळे यांनी या उत्सवाचे काटेकोर नियोजन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT