तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तातडीने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पावसाअभावी तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यांतील भूजल पातळी वेगाने खालावली आहे. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडू लागल्याने उपलब्ध जलस्रोतांवर प्रचंड ताण आला आहे. येत्या काळात पावसाने हुलकावणी दिल्यास अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागतील, तसेच पशुधनाच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनेल. त्यामुळे टंचाई अधिक तीव्र होण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे.
पाण्याच्या तुटवड्यामुळे द्राक्ष, ऊस आणि अन्य बागायती पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक बनले असून खरीप पिकेही धोक्यात आली आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी, चारा छावण्यांचे नियोजन आणि बागायती पिकांच्या संरक्षणासाठी शासनाने तातडीने मदत द्यावी व मतदारसंघात अधिकृतपणे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी, अशी मागणी रोहित पाटील यांनी केली आहे.