तासगाव : येथील आमसभेत बोलताना आमदार रोहित पाटील. pudhari photo
सांगली

Sangli News: तासगावच्या आमसभेत अधिकार्‍यांची झाडाझडती

साडेनऊ तासांच्या सभेत प्रश्नांची सरबत्ती; सर्व विभागांचा आढावा

पुढारी वृत्तसेवा
तासगाव : दिलीप जाधव

आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तासगावात 24 वर्षांनंतर आमसभा पार पडली. सोमवारी येथील परशुराम माळी मंगल कार्यालयात तब्बल साडेनऊ तास झालेल्या आमसभेत ग्रामस्थांनी अधिकार्‍यांची अक्षरशः झाडाझडती घेतली. सर्वच विभागाच्या खातेप्रमुखांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

विविध विभागांचा गेल्या वर्षभरातील कामांचा आढावा घेण्यात आला. नागरिक व ग्रामस्थांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. याशिवाय आयत्या वेळी येणार्‍या प्रश्नांवर आमसभेचे अध्यक्ष, आमदार रोहित पाटील यांच्या संमतीने चर्चा करून तोडगा काढला.

आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांकडे रुग्णवाहिका वेळेत येत नाही. डॉक्टर नाहीत, औषधे नाहीत, नुसतेच दवाखाने असून तर काय उपयोग, चिठ्ठी देऊन बाहेरुन औषधे आणावी लागतात. यावर तोडगा काढण्याची मागणी केली. जागा असूनही डॉक्टर राहात नाहीत. परिवहनच्या अधिकार्‍यांवर बस फेर्‍या वेळेवर नाहीत, गाड्या बंद पडतात, असे प्रश्न उपस्थित केले.

महावितरणच्या अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. वीज जोडणी तोडून 15 वर्षे झाली तरी बिल येते, मागणी नसताना मीटर बदलले जाते. याशिवाय मुद्रांक शुल्क मिळत नाही, कृषी विभागाच्या योजना बांधापर्यंत पोहोचत नाहीत. अधिकारी, कृषी सहाय्यक शेतकर्‍यांना भेटत नाहीत, निधी आला तर तो कुठे खर्च केला जातो, याची काहीही माहिती मिळत नाही, सनद वाटपात चुका आहेत, असे आरोप ग्रामस्थांनी केले.

अवैध धंदे कायमचे बंद करा, कोणास पाठीशी घालू नका, अशी पोलिस विभागाकडे मागणी केली. स्वच्छतेचा खेळखंडोबा आहे. नगरपालिकेचे सीसीटीव्ही बंद आहेत. पाणीमीटरचे स्टॉकबुक गहाळ आहे, मोराळेला स्मशानभूमी नाही, शालेय पोषण आहाराची चोरी होते, पंचायत समितीच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, बाजार समितीचे निकृष्ट बांधकाम, याबाबत प्रश्न उपस्थित केले.

बेदाण्याची उधळण, त्याच्यातील तूट, जनावरांचा दवाखाना सुसज्ज असूनही सांगली-मिरजेला जावे लागते. ग्रामसेवक आहे तर तलाठी नाही, अधिकारी कोणत्याही भागात उपस्थित राहत नाही. नागरिकांची कामे होत नाहीत, पैसे मागितले जातात, अशा प्रश्नांची सरबत्ती करत नागरिकीांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

अनेकदा आमदार रोहित पाटील यांनी मध्यस्थी करत अधिकार्‍यांना खडसावले, ‘तुमच्यात सुधारणा न झाल्यास कारवाई करु, असा इशारा दिला. काही तक्रारींची रोहित पाटील यांनी जागेवरच सोडवणूक केली. काही प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. काही प्रश्न स्वतंत्र बैठक आयोजित करून सोडवण्याची ग्वाही दिली. शासन पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

‘अन्न-भेसळ’च्या अधिकार्‍यांची पाठ

आमसभेदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे यांनी तासगाव तालुक्यात अनेक ठिकाणी खाद्यपदार्थात भेसळ होत आहे. पैशासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अन्न व भेसळ विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्षभरात तोडपाणी करण्याशिवाय काहीही केले नाही, असा आरोप केला. वर्षभरात काय कारवाई केली याची आकडेवारी द्यावी, अशी मागणी केली. परंतु या विभागाचा अधिकारी आमसभा सोडून निघून गेल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला. यावेळी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT