तासगावात ‘अन्न-भेसळ प्रतिबंध’चे दूध व्यावसायिक, बेकर्‍यांवर छापे टाकले. File Photo
सांगली

तासगावात ‘अन्न-भेसळ प्रतिबंध’चे दूध व्यावसायिक, बेकर्‍यांवर छापे

अनेक ठिकाणचे नमुने घेतले; दुकानदारांचे धाबे दणाणले

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : शहरातील दूध डेअरी, बेकरी, दुग्धजन्य पदार्थ विक्री तसेच उत्पादन करणार्‍या आस्थापना, अशा विविध ठिकाणी सांगलीच्या अन्न भेसळ प्रतिबंध प्रशासन पथकाने अचानक छापे टाकले. अचानक कारवाईमुळे भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणार्‍या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सांगली जिल्हा अन्न भेसळ प्रतिबंध विभागाकडून तासगाव शहरातील विविध बेकरी दुकाने, दूध डेअरी, दुग्ध जन्य पदार्थ बनविणार्‍या आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. स्टेशन रोड लगत, राजवाड्याजवळ असणार्‍या, श्रीराम मंदिर जवळील, विटा नाका येथील एका प्रसिद्ध दूध डेअरीवर पथकाने छापे टाकले. या ठिकाणच्या व्यावसायिकाकडील दूध व दुग्धजन्य पदार्थाचे नमुने पथकाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

पथकातील अधिकार्‍यांनी बेकरी, दुकाने व डेअरीमध्ये असणार्‍या म्हैस, गाईचे दूध, तूप, ताक, खवा, पनीर अन्य खाद्य पदार्थांचे नमुने घेतले. दुधातील फॅट तपासणी तसेच दुधामध्ये रासायनिक पदार्थांची भेसळ आहे का? तसेच ग्राहकांना देण्यात येणार्‍या वजनामध्ये तफावत आहे का? याची तपासणी केली जाणार आहे.अचानक पडलेल्या छाप्यांमुळे दुग्ध व्यावसायिक व बेकरी पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यामध्ये खळबळ उडाली होती.

बेकरीत विक्री केले जाणारे तळलेले पदार्थ भेसळयुक्त तेल आणि खराब तेलात बनविलेले असल्याबालबत शहरात उघड चर्चा होताना दिसत आहे. या छापेमारीने बेकरी व दूध डेअरी व्यावसायिक हबकले असले तरी नागरिकांतून कारवाईचे समाधान व्यक्त होत आहे. अशा प्रकारचे छापे सातत्याने सुरू राहिल्यास भविष्यात ग्राहकांना निर्भेळ दूध आणि दुग्ध जन्य पदार्थ व बेकरी पदार्थ खायला मिळतील, अशा भावना ग्राहकांतून व्यक्त होत आहेत.

कारवाई होणार का?

शहरातील अनेक ठिकाणी भेसळीचे दूध विकले जात असल्याच्या चर्चा सुरू असताना अन्न भेसळ प्रतिबिंध विभागाने शहरातील नामांकित डेअरी आणि बेकरी दुकाने याच्यावर छापे टाकून दूध व दुग्धजन्य पदार्थ तपासणीसाठी घेतले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी याची सत्यता पडताळली तर भेसळ उघडकीस येणार असल्याने ग्राहकांच्या नजरा पथकाची कारवाई काय होते, याकडे लागून राहिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT