सांगली

Bullock cart accident : वायफळे उरुसात मानाच्या बैलगाडीला अपघात; बैल फरफटत गेला

backup backup

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वायफळे येथील उरुस सुरु झाला आहे. यावेळी मानाचा बैलगाडा पळवला जात असताना सलग दुसऱ्या वर्षी अपघात झाला. गाडा पळवताना एक बैल घसरुन पडला. तो 100 ते 110 फूट फरफटत गेला. अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला. तर फरफटत गेलेल्या बैलाला जखम झाली. गाड्यासह रस्ता सोडून दुसरीकडे गेल्याने दुचाकींचेही नुकसान झाले आहे.

वायफळे येथे हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येऊन पीर गैबीसाहेब यांचा उरूस उत्साहात साजरा करतात. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. मंगळवारी सायंकाळी गावातील प्रमुख रस्त्यावरून मानाचा गाडा पळवण्यात आला.
गाड्याचा मान कडेमळा येथील भाविकांना आहे. सायंकाळी गाडा सजवून गावात आणला. चार बैलांचा गाडा प्रमुख रस्त्यावरुन सोडण्यात आला. पुढे काहीजण पळत होते. आडवे कोणी येऊ नये, याची काळजी घेतली जात होती. हा गाडा पहायला रस्त्याच्या दुतर्फा शेकडो लोकांनी गर्दी केली होती.

गाडा तलाठी कार्यालयासमोर आल्यानंतर बैल भरकटले. रस्ता सोडून दुसरीकडे गेले. हा गाडा नंतर पळत बसस्टँडच्या दिशेने आला होता. बसस्टँडवरून पुढे जाताना अचानक एक बैल कोसळला. इतर तीन बैलांनी जवळजवळ 100 फूट त्या बैलाला फरफटत नेले. याचवेळी गाड्यातील लोकांनी खाली उड्या मारल्या. यामध्ये बैल व एकजण जखमी झाला आहे.

उरुसाच्या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात

वायफळे येथील उरुसाच्या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात झाल आहे. मागील वर्षीही या गाड्याचा जू तुटल्याने अपघात झाला होता. यावर्षीही गाडा ओढणारा बैल कोसळल्याने अपघात झाला.

SCROLL FOR NEXT