तासगावमध्ये बसच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू 
सांगली

Tasgaon Accident : तासगावमध्ये बसच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

गणपती मंदिरासमोरील वळणावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : येथील गणपती मंदिरासमोरील वळणावर बसने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दीपक वसंत हिंगमिरे (वय 53, रा. सूर्यवंशी गल्ली, गुरुवार पेठ, तासगाव) असे मृताचे नाव आहे. रविवार, दि. 12 रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

दीपक हिंगमिरे हे रविवारी सकाळी दर्शनासाठी गणपती मंदिरात गेले होते. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर समोरील दूध केंद्रातून त्यांनी दूध घेतले. तेथून बाहेर येत असताना सांगलीकडून विट्याकडे जाणाऱ्या विटा आगाराच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते जमिनीवर कोसळले. बस चालकाला नियंत्रण मिळवता न आल्याने बसचे चाक हिंगमिरे यांच्या अंगावरून गेले, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने हिंगमिरे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

हिंगमिरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. ते कडधान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या निधनामुळे गुरुवार पेठ व बाजार समिती परिसरात शोककळा पसरली. रात्री उशिरा येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोन महिन्यांपूर्वीही अपघात

व्यवसायानिमित्त दीपक हिंगमिरे नेहमी प्रवासात असायचे. दोन महिन्यांपूर्वी ते दुचाकीवरून मणेराजुरीहून तासगावकडे जात असताना सरस्वतीनगरजवळ उसाने भरलेली ट्रॉली त्यांच्या अंगावर उलटली होती. नागरिकांनी त्यांना उसाच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT