आष्टा : आष्टा - बावची रोडवरील जुना शिंदे मळा येथे सागर शिंदे यांच्या शेतातील झाडाला बाहुली, लिंबू, पिना व काळा दोरा बांधलेला आढळून आला. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सागर शिंदे यांच्या शेतात सकाळच्या सुमारास काही कामगार कामासाठी गेले असताना एका झाडावर बाहुली, लिंबू व दोर्याने गुंडाळलेला प्रकार दिसून आला. हा प्रकार पाहताच कामगारांनी याबाबत परिसरातील लोकांना माहिती दिली. काही वेळातच या परिसरातील लोकांची शेताजवळ गर्दी झाली. जादूटोणाच्या या प्रकाराने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 21 व्या शतकातही अशा प्रकारची अंधश्रद्धा समाजात टिकून आहे, ही खेदाची बाब असल्याचे काही जागरूक नागरिकांनी सांगितले.
या प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली असून, अंधश्रद्धेच्या घटना रोखण्यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले आहे.