सांगली : पुढारी वृत्तसेवा
सशक्त अभिनयाने रंगभूमीपासून छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही वेगळे अस्तित्व तयार करणार्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाच्या ‘विष्णुदास भावे’ गौरव पदकाचा मान मिळाला. नाट्यपंढरी सांगलीत रंगभूमीदिनी पाच नोव्हेंबररोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या रंगकर्मीस हे पदक देऊन सन्मानित केले जाते. यंदा मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या सुहास जोशी यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. ही माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली. हा 56 वा पुरस्कार आहे. गौरवपदक, रोख 25 हजार व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुहास जोशी अनेक वर्षे रंगभूमी, चित्रपट, टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात आहेत. त्यांना अनेक संस्थांतर्फे जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांनी 25 मराठी नाटके, अनेक हिंदी, मराठी दूरदर्शन मालिका, तसेच मराठी, हिंदी चित्रपटांत काम केले आहे. ‘आनंदी गोपाल, नटसम्राट, डॉक्टर तुम्ही सुद्धा, प्रेमा तुझा रंग कसा, स्मृतिचित्रे, अग्निपंख’ आदी नाटकांतील त्यांच्या व्यक्तिरेखा गाजल्या. तसेच ‘तू तिथं मी, आनंदी आनंद, मुंबई-पुणे-मुंबई’ यांसारखे गाजलेले अनेक मराठी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. गेली काही वर्षे त्या लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षण वर्गाचे संचालन करीत आहेत.
सांगलीतील लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. यानिमित्त या कार्यक्रमामध्ये त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
विष्णुदास भावे गौरव पदक मला मिळतेय, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पन्नास वर्षे काम केल्याचे चीज झाल्याची भावना आहे. माझ्या कामाचा महाराष्ट्राने गौरव केला असे वाटते.- सुहास जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री.