आमदार सुहास बाबर File Photo
सांगली

Suhas Babar| भाजपसह सगळे पक्ष मी चालवतो : सुहास बाबर

मुख्यमंत्र्यांबद्दलच्या कथित विधानामुळे संपूर्ण राज्यभरात गदारोळ

पुढारी वृत्तसेवा

विटा : खानापूर मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या कथित विधानामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. खानापूर तालुक्यातील पळशी गावामध्ये करंजे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांचा प्रचारादरम्यान मंगळवारी रात्री आमदार बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला शिवाय भाजपासहित सगळे पक्ष मी चालवतो, असे विधान केले. त्यावरून दिवसभर गदारोळ माजला. मात्र दिवस सरताच बाबर यांनी भूमिका मांडली. त्यांचे मूळ विधान नेमके काय होते. आणि त्यावर विविध नेते काय बोलले ? याची चर्चा सुरू झाली.

तुमच्या-आमच्यामुळे नव्हे तर महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचे फडणवीस मुख्यमंत्री : नवनाथ बन

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले, तुमच्या आमच्यामुळे नव्हे तर महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. अकरा कोटी जनतेने त्यांना आशीर्वाद दिले. अकरा कोटी जनतेच्या जीवावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. त्यामुळे ‌‘आमच्यामुळे- तुमच्यामुळेच‌’ असं कोणत्याही आमदाराला म्हणण्याचा अधिकार नाही.

म्हणण्याचा विपर्यास झाला असावा ः भाजप आमदार प्रसाद लाड

आमदार प्रसाद लाड म्हणाले, मला वाटतं वाक्याचा विपर्यास केला गेला असावा आणि ते जर अशा प्रकारचे वाक्य बोलले असतील तर माफी मागतील. कारण देवेंद्र फडणवीस संपूर्ण महायुतीचे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका एकत्रित लढलो. अशा प्रकारचे वाक्य ते बोलले असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी. फडणवीस यांचा सन्मान म्हणून या गोष्टीला त्यांनी मान्य करू नये.

सुहास बाबर आमचे चांगले मित्र ; त्यांना मी विचारतो ः चंद्रकांत पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सुहास बाबर यांच्या आधी त्यांचे वडील अनिल बाबर हे मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे देवेंद्रजींच्या आणि माझ्या अतिशय जवळचे होते. त्यामुळे त्यांना असे का म्हणावेसे वाटलं? संदर्भ काय आहे, हे बघावे लागेल. आम्ही त्यांना नेहमीच रिस्पेक्ट देतो. खानापूर तालुक्यात सगळेच पक्ष आम्हीच चालवतो, असे बाबर म्हणाले, याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, असं असेल तर उत्तमच आहे. आमच्याकडे कोणी कोणाला चालवावं हा काही प्रश्नच नाही. पण या वाक्याचा अर्थ कळत नाही.

...नाहीतर पहिली टर्म शेवटची ठरेल? ः मंत्री गिरीश महाजन

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, सगळे पक्ष माझ्या खिशात आहेत, भाजपसुद्धा मीच चालवतो, असे बाबर म्हणत आहेत, हे अतिशय चुकीचे स्टेटमेंट आहे. ही गंभीर गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत आहेत. खरे तर राजकारणात त्यांची आत्ता सुरुवात आहे. दीड-एक वर्षापूर्वी ते निवडून आले आहेत. त्यांनी तोलून-मापून बोलले पाहिजे, असं मला वाटते. ते लहान आहेत. नवीन आहेत. मला वाटते त्यांनी राजकारण समजून घ्यावे. बाबरसाहेब आमच्या सोबत होते. परंतु त्यांचा तोल असा कधीही गेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. नाहीतर मग सुरुवातीलाच शेवट होईल. तुम्ही असे समजू नका की सगळेच पक्ष तुमच्या खिशात आहेत. भाजपला तुम्ही काय खिशात घेता? भाजपला तुम्ही काय चालवता? नाहीतर तुमची पहिली टर्म ही शेवटची टर्म ठरेल.

एकमेकांबद्दल आदर राखला गेलाच पाहिजे ः वैभव पाटील

मला वाटते यामध्ये काही संस्कार असतात. आपण महायुतीत आहोत, हे तुम्ही विसरलात. भाजपचे 144 आमदार आहेत. काही अपक्ष मिळून 147 च्या पुढे संख्या आहे. वास्तविक यांच्या कुणाची गरजसुद्धा नाही. परंतु एकदा युती म्हटल्यानंतर युतीधर्म पाळावा लागेल. एकमेकांबद्दल आदर राखला गेलाच पाहिजे. जरी भाजपाचा एखादा कार्यकर्ता तुम्हाला टीका करताना काही बोलला असेल, त्याच्यावरून मुख्यमंत्र्यांवर तुम्ही का घसरलात? तुम्ही आता या मतदार संघाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे बोलताना काळजी घेतली गेलीच पाहिजे. तुम्ही म्हणता भाजप पक्ष तुम्ही चालवता. मग ही निवडणूकच उभाच राहिली नसती. मग तुम्हाला आत्ता जी पळापळ करावी लागत आहे, ती करायचे काम नव्हते. भाजपच्या कार्यकर्त्यांना किंबहुना जनतेला जर तुम्ही गृहीत धरत असाल, तर त्याचे चोख उत्तर मिळेल.

सुहास बाबर काय म्हणाले होते ?

‌‘माझ्यासारखे 242 आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे. काय सांगतायत म्हणे, की मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते. अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 242 आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला, कोण आहे सुहास बाबर... याचे उत्तर तुला मुख्यमंत्री देईल. एवढं सोप्प नाही. राजकारण म्हणतात तेवढं सोपं नसतं. आम्ही 242 तिथं फिरतोय अवतीभवती. तुझा कुठलापण नेता तुझ्या जवळचा तिथे तुला घेऊन जाऊ दे की, आणि सुहास बाबर जाऊदे, नाय मला आत घेतलं आणि तुला, तुला म्हणजे तुझ्या नेत्याला बाहेर बसवलं, तुझा काय संबंध नाही तर नाव कशाला? हा सुहास बाबर काँग्रेसपण चालवतो, राष्ट्रवादी शरद पवार पक्षपण चालवतो, राष्ट्रवादी अजित पवार पक्षपण चालवतो, उबाठापण चालवतो, शिवसेनापण चालवतो आणि भाजपपण चालवतो. मी फक्त दिसतो शांत... मी शांत आहे, पण करायला लागलो कार्यक्रम तर विट्यात काय केलं त्यानं जवळनं बघितलंय.

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलेला नाही

तुझा जरी मुख्यमंत्री असला तरी आम्ही सगळे एकत्र काम करतोय म्हणून तुमचा मुख्यमंत्री आहे असे मी म्हणालो. मी कुठेही एकेरी उल्लेख केलेला नाही. निवडणूक आहे म्हंटल्यावर टीका-टिप्पणी होणारच, माझ्यावर टीका कितीही करा, पण दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्यावर कशासाठी खालच्या भाषेत टीका, शिव्या... खानापूर भागातला एक स्थानिक कार्यकर्ता म्हणतो, अनिलभाऊंनी मतदार संघासाठी काय केले, मुख्यमंत्री आमचा म्हणून सगळं चाललंय, त्यावर मी म्हंटलं की, आम्ही 242 जण आहोत, मी फक्त 60 जण आहोत, असे म्हंटलेले नाही. जे बोललो ते त्याला उद्देशूनच होते. माझे भाषण ग्रामीण शैलीत आणि बोली भाषेत होते. वास्तविक देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. आमच्या वडिलांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मला पुत्रवत प्रेम दिले, ही गोष्ट अनेकांना बघवत नाही. माझे मूळ भाषण काटछाट कडून प्रसारीत केले जात आहे. त्याचे विद्रूपीकरण करण्याचे काम विरोधक करीत आहेत, त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT