Khanapur Taluka Election Results  Pudhari
सांगली

Khanapur Election Results | खानापुरात पुन्हा एकदा बाबरांचे वर्चस्व : पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा, भाजपचा सुपडा साफ

Sangli ZP Election Results | आमदार सुहास बाबर आणि विट्याचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले

पुढारी वृत्तसेवा

Khanapur Taluka Election Results

विटा: खानापूर तालुक्याच्या राजकारणात आमदार सुहास बाबर आणि विट्याचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विधानसभा आणि नगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही बाबर बंधूंनी विरोधकांना 'व्हाईट वॉश' दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ अशा सर्वच्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

बाबर घराण्याचे ५० वर्षांचे वर्चस्व अबाधित

गेल्या पाच दशकांपासून खानापूर पंचायत समितीवर बाबर घराण्याची पकड आहे. पक्ष बदलले तरी या भागातील जनतेचा बाबर घराण्यावरील विश्वास कायम असल्याचे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले. आमदार सुहास बाबर यांची आक्रमक प्रचारशैली आणि अमोल बाबर यांचे सूक्ष्म नियोजन व चोख व्यवस्थापन यांच्या जोरावर शिवसेनेने हा विजय खेचून आणला.

करंजे गटात चुरस, पण विजय शिवसेनेचाच

यंदाची निवडणूक एकतर्फी होईल असा अंदाज होता, मात्र करंजे गटात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः विशेष लक्ष घातल्याने तिथे चुरस निर्माण झाली होती. भाजपचे तानाजी पाटील आणि शिवाजी माने यांनी शेवटच्या फेरीपर्यंत शिवसेनेच्या उमेदवारांना झुंजवले. मात्र, अखेर:

सई शिंदे (शिवसेना): ४३१ मतांनी विजयी.

सुहास शिंदे (शिवसेना): १,११० मतांनी विजयी.

पांडुरंग खोत (शिवसेना - करंजे गण): २०४ मतांनी विजयी.

नागेवाडीतून डॉ. शीतल बाबर यांचे ऐतिहासिक मताधिक्य

बाबर घराण्याचा पारंपरिक गड असलेल्या नागेवाडी जिल्हा परिषद गटातून डॉ. शीतल अमोल बाबर यांनी तब्बल १०, ६१४ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवून विरोधकांचे धाबे दणाणून सोडले. या विजयाने तालुक्यात बाबर गटाची ताकद किती खोलवर रुजलेली आहे, हे स्पष्ट झाले.

या निकालाने त्यांनी केवळ खानापूरच नव्हे, तर संपूर्ण राज्याला आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. खानापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा कोण? हे या निकालाने सिद्ध झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT