कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन 3 हजार 100 रुपये देण्याचा निर्णय जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. .अशी माहिती माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदारांनी घेतलेला हा निर्णय
अमान्य असल्याचे सांगितले.कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे सांगली जिल्ह्यात दर द्यावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली. कडेगाव येथे डॉ.पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाण्याचे संचालक आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने आयोजित कारखंदारांच्या बैठकीत हा 3 हजार शंभर रुपये पहिली उचल ऊसदर देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला .या बैठकीत खासदार संजय पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण लाड,आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उदगिरी शुगरचे उत्तमराव पाटील, युवा नेते विशाल पाटील, राजारामबापू कारखान्याचे व्हा.चेअरमन विजय पाटील, दत्त इंडियाचे जितेंद्र धारु, हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम म्हणाले, ज्या साखर कारखान्यांनी मागिल वर्षी ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रतिटन रुपये 2 हजार 900 पेक्षा जादा ऊसदर अदा केलेला आहे. त्यांनी प्रति मेट्रीक टन 50 रुपये व 2 हजार 900 पेक्षा कमी दर अदा केलेल्या कारखान्यांनी मागील वर्षाच्या एफ.आर.पी. दरापेक्षा किमान रुपये 100 रुपये जादा दर अदा करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव दाखल करुन शासन स्तरावरून मंजूरी प्राप्त झालेनंतर ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.असे आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी यावेळी सांगितले.
कडेगाव येथे साखर कारखानदारांची बैठक संपन्न झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह संघटनेच्या प्रतिनिधीनी साखर कारखानदारांच्या बैठकीतील निर्णय अमान्य असल्याचे सांगितले .कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे कारखानदारांनी एफआरपी अधिक शंभर रुपये चालू वर्षीचा ऊस दर जाहीर करावा.तसेच मागील वर्षी 3 हजार पेक्षा कमी ऊसदर दिलेल्या कारखान्यानी 100 रुपये जादा अदा करावे व 3 हजार पेक्षा जादा ऊस दर दिलेल्या कारखान्यानी 50 रुपये जादा अदा करावे अशी मागणी खराडे व राजोबा यांनी केली आहे.
कारखानदारांच्या वतीने आमदार डॉ.विश्वजित कदम हे तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.आजच्या बैठकीतील निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अमान्य आहे.यावर आमदार विश्वजीत कदम यांनी सोमवारी साखर कारखानदारांशी व खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.