सांगली : साखर कारखाने काटामारी करतात, याबाबतचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दहा वर्षांपूर्वीच दिले आहेत. त्यामुळे त्यांनी आता तरी कारवाई करण्याचे धाडस दाखवावे. शेतकर्यांच्या खिशातून 15 काढून मदतग्रस्तांना फक्त पाच रुपये देणार, म्हणजे सरकारकडून 70 टक्के दलाली घेतली जात आहे. अशी दलाली घेणारे सरकार यापूर्वी कधी पाहिले नाही, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.दरम्यान, जयसिंगपूर येथे 24 वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गुरुवारी ऊस परिषद होत आहे. शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शेट्टी म्हणाले, साखर कारखाने हे काटामारी करतात, याचे पुरावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखान्यांच्या नावानिशी दहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत. त्यांना आता समजले की, कारखानदार काटा मारतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता त्यांना किती वेळ लागेल, हे सांगता येणार नाही. अतिवृष्टीने जो शेतकरी पिचून गेला आहे, त्याला मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्यांकडून 15 रुपये घेण्यात येणार आहेत. पण त्या अतिवृष्टीच्या शेतकर्याला मदत मात्र पाच रुपयांची केली जाणार आहे. याचाच अर्थ शेतकर्यांच्या खिशातील पैसा काढून सरकार यामध्ये 70 टक्के दलाली घेत आहे. इतकी मोठी दलाली घेणारे सरकार यापूर्वी पाहिले नव्हते.
आठवड्याला सहा ते सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासनाने तत्काळ शेतकर्यांना मदत केली पाहिजे. शेतकर्यांना मदत करण्यासाठी शासनाने जी आकडेवारी जाहीर केली आहे. ती फसवी आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती, पण आता ते स्वतः मुख्यमंत्री आहेत, ते मात्र ओला दुष्काळ का जाहीर करत नाहीत.
शेट्टी म्हणाले, जयसिंगपूरमध्ये 16 ऑक्टोबररोजी होणार्या ऊस परिषदेमध्ये काटामारी, रिकव्हरीची तूट आणि तोडणी-वाहतूक खर्च यावर चर्चा होणार आहे. याशिवाय याठिकाणीच पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. या वेळेचा हंगाम हा फक्त 90 दिवस चालेल इतकाच आहे.