सांगली : सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरदार सुरू आहे. अपवाद वगळता बहुतेक साखर कारखान्यांकडून काटामारी होत असल्याच्या तक्रारी आहेत, मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
काटामारी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येते. भरारी पथकाची स्थापना करण्यात येते. यंदा हंगाम निम्मा संपत आला तरी अजून समितीची बैठक झाली नाही. भरारी पथकाची स्थापनाही झालेली नाही. त्यामुळे वजन काट्याची तपासणी करण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकर्यांची राजरोसपणे लूट सुरू आहे.
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी निवडणुका, पाऊस यामुळे साखर कारखाने उशिराने सुरू झाले. त्यातच पावसाचा सातत्याने व्यत्यय येत आहे. त्यामुळे ऊस लवकरात लवकर कारखान्याला जावा यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. मात्र त्याचा गैरफायदा ऊस तोडणी करणारे व काही कारखानदार घेताना दिसून येत आहेत. ऊस तोडण्यासाठी शेतकर्यांकडून पैसे घेण्यात येतात. त्याशिवाय काटामारीचे प्रकार वाढत आहेत. काटामारीबाबत शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये भरारी पथकांची स्थापना करून कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी करण्यात यावी, असे आदेश आठ वर्षांपूर्वी तत्कालीन साखर आयुक्तांनी दिले होते.
वैधमापन शास्त्र विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस विभागाचे अधिकारी आणि साखर प्रादेशिक सहसंचालक यांच्या प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक नेमण्यात यावे. एखाद्या साखर कारखान्यात वजनासंदर्भात गैरप्रकार होत असल्याची तक्रार संबंधित यंत्रणा किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यास संबंधित भरारी पथकाने तेथे जाऊन वजन-काट्याची तपासणी करावी. त्यामध्ये गैरप्रकार आहे का? याची शहानिशा करून गैरप्रकार आढळल्यास संबंधित यंत्रणेमार्फत कारखान्यावर कार्यवाही करावी, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक वर्षी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून बैठक घेतली जाते. कारखान्याच्या वजन-काट्याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात येते. यंदा डिसेंबर संपला तरी अद्याप समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे भरारी पथके स्थापन करण्यात आलेली नाहीत.
काही ठिकाणी वजन-काटे हायड्रॉलिक प्रेशरवर चालवतात. ते मॅन्युअली ऑपरेट केले जातात. यात वजन केल्यानंतर पावतीवर आकडा लिहिताना हातचलाखी केली जाते. भरलेल्या वाहनाचे वजन कमी व रिकाम्या वाहनाचे वजन जादा दाखवण्याची चलाखी केली जाते. तसेच कर्मचार्यांद्वारे वजन-काटे ऑपरेट करतेवेळी पायाने दाबल्या जाणार्या हायड्रॉलिकच्या खाली लाकडी पट्टी ठेवली जाते. त्यामुळे काटा थांबून ठराविक टनापर्यंत ताणला जातो. ही काटामारी बर्याचदा रात्री केली जाते.
जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखानदारांकडून काटामारी केली जाते. याकडे जिल्हा प्रशासनाचे हेतुपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. हंगाम संपत आला तरी अजून भरारी पथके तयार केलेली नाहीत, यावरून प्रशासनाचा कारभार उघड झाला आहे.- महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.