सांगली : भाजपमुळेच सांगलीचा विकास झाला आहे. त्यामुळे केवळ विकासाच्या राजकारणाला साथ देऊन भाजपला मतदान करा. शहरातील प्रलंबित सर्व कामे पूर्ण केली जातील. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची संघटनशक्ती आणि भाजपच्या ठोस धोरणांच्या बळावर सशक्त, सुरक्षित व समृद्ध सांगली घडवू, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.
महापालिकेची निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी शहर व विस्तारित भागातील सर्व प्रभागांना भेटी देऊन उमेदवारांच्या प्रचाराला गती आणली आहे. नागरिकांनी जागोजागी आमदार गाडगीळ यांचे औक्षण आणि पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केले. आमदार गाडगीळ हे प्रचार बैठका, गाठीभेटी, रॅलीत सहभागी होऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. त्यामुळे मतदारांचा उत्साह दुणावला आहे. भाजपच्या उमेदवारांना त्याचा मोठा लाभ होत आहे.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली शहराच्या विकासाचा रोड मॅप मांडताना भाजपाच्या विकासाभिमुख व लोककल्याणकारी धोरणांचा उल्लेख केला. सुरक्षितता, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजपाने राबविलेल्या योजनांमुळे शहराच्या विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, केवळ विकासाच्या राजकारणाला साथ देऊन भाजपला मतदान करा. प्रलंबित कामे पूर्ण करून शहराला आदर्शवत करणे हाच माझा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार गाडगीळ यांनी शहरातील विविध समाजघटकांच्या बैठकांवर जोर दिला आहे. त्यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.