सांगली

जतमध्ये मराठा समाज आक्रमक; कर्नाटकच्या बसवर दगडफेक, टायरी पेटवून सरकारचा निषेध

backup backup

जत; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आज (दि. ३१) सकल मराठा समाजाच्यावतीने जत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरासह तालुक्यात ही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरात ठिक ठिकाणी टायरी पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला. मुचंडीजवळ कर्नाटक डेपोच्या एका बसवर दगडफेक करण्यात आली. तर बसवर असणाऱ्या मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.

मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या अमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मराठा आरक्षणाबाबत शासन वेळकाढूपणा करित आहे. त्यामुळे उपोषणकर्ते जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे आज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाज जत यांच्यावतीने जत बंदचे आवाहन केले होते. जर शहरासह शेगाव, बनाळी, वाळेखिंडी, मोकाशेवाडी, को. बोबलाद, माडग्याळ, उमदी, सोन्याळ, डफळापूर, उमराणी, आवंडी यासह तालुक्यातील अनेक गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

दरम्यान, आज (दि. ३१) जत शहरातील आठवडी बाजारचा दिवस असूनही भाजीपाला व फळे विक्रेत्याबरोबरच अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण जत शहरात बंद शांततेत सुरू होता. काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यावरून आंदोलनकर्ते व पोलीस प्रशासन यांच्याद वादावादी झाली. तर आंदोलनकर्त्यांनी काही वेळ येथील महाराणाप्रताप चौकात रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडावेळ वाहतूकीची कोंडी दिसून आली. परंतु पोलिसांनी मध्यस्थी करीत वाहतूक सुरळीत सुरू ठेवली.

कर्नाटक बस फोडली

आज (दि. ३१) दिवसभर जर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आंदोलनकर्ते संपूर्ण शहरात मराठा आरक्षणाच्या घोषणा देत होते. दुपारी जत शहराकडे विजापूरहून येणारी कर्नाटक आगाराची बस दोघा आज्ञातांनी फोडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका दुकानावर दगडफेक करण्यात आली आहे.

दरम्यान या आंदोलनाला शहरातील सर्वच राजकीय पक्ष, समाज बांधव, व्यापारी तसेच विविध घटकातील लोकांनी पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन ही देण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT