ईश्वरपूर : येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा व राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी यांच्यावतीने माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 25 व्या जयंत करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा दि. 13 ते 15 फेब्रुवारीअखेर लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात होणार असल्याची माहिती राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील व नाट्य परिषद ईश्वरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. सूरज चौगुले यांनी दिली.
या स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. एकांकिका स्पर्धा दररोज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहतील. जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी या एकांकिका पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये मुंबई, लातूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यांतून 26 संघांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेत प्रथम येणाऱ्या एकांकिकेस रोख रुपये 51 हजार व जयंत करंडक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाला रुपये 35 हजार, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघास रुपये 25 हजार, अशी अनुक्रमे पारितोषिके असून उत्तेजनार्थ तीन एकांकिकांसाठी प्रत्येकी रुपये 10 हजार, याबरोबरच स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन म्हणून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्थानिक एकांकिकेस रुपये 10 हजारचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, पुरुष अभिनय, स्त्री अभिनय, रंगभूषा वेशभूषा, प्रकाशयोजना, संगीत संयोजन आदीकरिता वैयक्तिक कलाकारांना रोख रकमेची पारितोषिकेसुद्धा देण्यात येणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. सूरज चौगुले, उपाध्यक्ष प्रा. प्रकाश जाधव, रजाक मुल्ला, राजाभाऊ कदम, रोझा किणीकर, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती मुंबईचे कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. संदीप पाटील, ईश्वरपूर शाखेचे कार्यवाह प्रा. अक्षय कुलकर्णी, सहकार्यवाह उदय पाटील, अनिल पाटील, प्रा. आशुतोष साळुंखे, योगिता माळी, गंधार जाधव, मनीषा पेठकर, डॉ. नीलम शहा, अज्ञाय पाटील, गणेश पोतदार आदी प्रयत्न करीत आहेत.