सांगली : सांगलीच्या शेरीनाल्याचे काम पूर्ण झाल्यास सांगली शहरातील पाणी तुंबण्याचा ७० टक्के प्रश्न सुटेल. त्यासाठी लागणारा ३०० कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा. केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली.
ते म्हणाले, गेली २० वर्षे शेरीनाल्याचा प्रश्न रखडला आहे. दर पावसाळ्यात सांगलीतील बुधगाव रोड, मिरज रोड, गणेशनगर या भागात गुडघाभर पाणी साचते. घरांमध्ये पाणी शिरते, दुकानांचे नुकसान होते. शेरीनाला हा केवळ सांगलीचा नाही, तर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे.
महामार्गांची दयनीय अवस्था
कदम म्हणाले, राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. सांगली-कोल्हापूर, सांगली-तासगाव, सांगली-इस्लामपूर या प्रमुख मार्गांवर तर प्रवास करणे जिवावर बेतत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी रस्त्यांसाठी मंजूर होतो, पण सहा महिन्यांतच रस्ते उखडतात. याचा अर्थ एकच, एक तर दर्जाहीन साहित्य वापरले जाते किंवा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा जनतेच्या कराचा पैसा आहे. टोल, कर भरूनही नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत. मग हा पैसा जातो कुठे? निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीची कारवाई का होत नाही? संबंधित अभियंत्यांची जबाबदारी का निश्चित होत नाही?"
महावितरणची दादागिरी
कडेगाव शहर : महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविताना शेतकरी, सामान्य वीज ग्राहकांना दमदाटी करून, जबरदस्तीने मीटर बसवले जात आहेत. तसेच त्यानंतर अवाच्या सवा वीज बिले पाठवली जात आहेत. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीयांवर होत असलेला हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आमदार कदम यांनी दिला.
ते म्हणाले, संपूर्ण राज्यात स्मार्ट मीटर बसविताना अनेक ठिकाणी घरात पुरुष नसताना, केवळ महिला व लहान मुले एकटी असतानाही जबरदस्तीने प्रवेश करून मीटर बसवले जात आहेत. नागरिकांना विश्वासात न घेता दमदाटी करून ही प्रक्रिया राबवली जात असून, ही अरेरावी तातडीने थांबवली पाहिजे.