चंद्रकांत पाटील. pudhari photo
सांगली

झेडपी, पालिका निवडणुकांसाठी कामाला लागा : चंद्रकांत पाटील

सांगलीत भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागा. पक्षाचे प्रत्येक मंडल कार्यालय सुरू झाले पाहिजे. पक्ष हा आमदार, खासदार कार्यालयातून नव्हे, तर तो पक्ष कार्यालयातून चालला पाहिजे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

विश्रामबाग येथे भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. पक्षाचे पदाधिकारी, विविध मोर्चांचे अध्यक्ष, पक्ष कार्यकारी सदस्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर, राज्य संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजप नेते दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संंग्रामसिंह देशमुख, नीता केळकर, संगीता खोत, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, विक्रम पाटील, वैभव पाटील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगलीत पक्षाचे भव्य कार्यालय साकारत आहे. त्यास अजून दोन महिने लागतील. तोपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुका जवळ आल्याने तात्पुरती गरज म्हणून जिल्हा कार्यालय सुरू केले आहे. मंडलस्तरावरही पक्षाचे कार्यालय सुरू करावे. पक्ष कार्यालयातून पक्षाचे कामकाज प्रभावीपणे करा. जिल्हाध्यक्ष महाडिक म्हणाले, पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना सर्व समाजातील घटकांना न्याय देण्यात आला आहे. भाजपमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे पदापासून वंचित असलेल्या कार्यकर्त्यांना दुसर्‍या यादीत संधी देऊ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT