सांगली : अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी प्रवासात सवलती देण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डाची (एनसीएमसी) सक्ती मंगळवारपासून सुरू झाली असली, तरी तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांमधील माहितीच्या अभावामुळे गुरुवारीही वाहक व प्रवाशांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. वादाला कंटाळून वाहकांनी कामकाजावर बहिष्काराचा इशारा देताच एसटी प्रशासनाने नमती घेत पुढील आदेशापर्यंत पूर्वीप्रमाणेच सवलत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एनसीएमसी कार्डाची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी बहुतांश नागरिकांनी अद्याप हे कार्ड काढलेले नाही. गुरुवारी दिवसभर सांगलीच्या मुख्य बसस्थानकात कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची मोठी रांग लागली होती. एक कार्ड देण्यासाठी वेळ लागत असल्याने नागरिक ताटकळत उभे होते.
दुसरीकडे, बसमध्ये मशीनला रेंज नसणे, सर्व्हर डाऊन असणे आणि वाहकांना 'टॉप-अप' (रिचार्ज) बाबत माहिती नसल्याने कार्ड स्वाइप करताना मोठ्या अडचणी आल्या. यामुळे वाहकांनी पूर्ण तिकीट आकारण्यास सुरुवात केल्याने प्रवाशांशी खटके उडाले. वाद वाढून बसेसला उशीर होऊ लागल्याने त्रस्त वाहकांनी कामावर बहिष्काराचा इशारा दिला. प्रवाशांचा संताप व वाहकांचा विरोध लक्षात घेता, व्यवस्थापक व स्थानक प्रमुखांनी मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
त्यानंतर प्रशासनाने तात्काळ जुन्याच पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्याचे आदेश दिले. त्यानुसार एनसीएमसी कार्ड असणारे, कार्डासाठी अर्ज केलेले किंवा ओळखपत्र दाखवणाऱ्या प्रवाशांना पूर्वीप्रमाणे रोख रक्कम घेऊन सवलत दिली जात आहे, अशी माहिती स्थानक प्रमुख महेश पाटील यांनी दिली.
घरपोच मिळणार कार्ड
एनसीएमसी कार्ड नसलेल्या प्रवाशांना प्रवासात त्रास होऊ नये म्हणून सध्या नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आपले मूळ ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) आणि ओटीपीसाठी मोबाईल सोबत आणून अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर १० ते १२ दिवसांत हे कार्ड थेट घराच्या पत्त्यावर पोहोचवले जाईल, असे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.