NCMC Card  Pudhari
सांगली

ST NCMC Card : एसटी कंडक्टरच करणार एनसीएमसी कार्ड रिचार्ज

महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा; कार्डासाठी मुदतवाढही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) रिचार्ज सुविधा आता थेट एसटी बसमधील कंडक्टरकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. या सुविधेमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे प्रवाशांना हे कार्ड काढण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.

सध्या एनसीएमसी कार्डमधील शिल्लक रक्कम संपल्यानंतर रिचार्ज करण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना आगार किंवा अन्य केंद्रांवर जावे लागत होते. त्यामुळे गैरसोय होत होती. आता प्रवासादरम्यानच कंडक्टरकडून कार्ड रिचार्ज करता येणार असल्याने ही धावपळ कमी होणार आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. प्रवाशांना हे कार्ड काढण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महिला प्रवाशांसाठी एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलतीची योजना सुरूच असून ज्येष्ठ नागरिकांना (६५ वर्षांवरील) १०० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे

भीम ॲपद्वारे करता येणार टॉपअप

एनसीएमसीधारकांना आता भीम ॲपच्या माध्यमातून कार्डचे टॉपअप करता येणार आहे. या सुविधेमुळे आता कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT