Vita Dumper hits bike woman killed
विटा : विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या एका दुचाकीला डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. प्रमिला धोंडी राम तांबे (वय ६२, रा. शितोळे गल्ली, विटा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकी चालक जखमी झाला. अपघातानंतर डंपर चालकास पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. प्रकाश टोलू राठोड (वय ३२, रा. घुमटमाळ, विटा) असे डंपर चालकाचे नाव आहे. हा अपघात आज (दि.२१) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सांगलीच्या दिशेने दुचाकीवरून बहिणभाऊ निघाले होती. चौकातून ही दुचाकी काही अंतरावर गेल्यानंतर मुरूमाने गच्च भरलेला डंपर (एम.एच. १२ एच.डी. ७९०३) हा पाठीमागून भरधाव वेगाने आला. या डंपरने दुचाकीस धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील प्रमिला तांबे या खाली कोसळल्या. त्यानंतर पाठीमागील चाकाखाली सापडल्या. मात्र, तरीही चालकाने डंपर तसाच वेगाने पुढे नेला. त्यामुळे मागच्या चाकाखाली अडकल्याने प्रमिला यांना तब्बल ५० फूट पुढे फरपटत गेल्या. यात त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद करून पंचनामा सुरू केला आहे. मात्र, भर चौकातच डंपर खाली चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विटा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान दुचाकी गाडीवर प्रमिला यांचा भाऊच असल्याचे सांगितले जात आहे.त्यांचे नाव राजेंद्र तांबे असे आहे.ते दुचाकी गाडीच्या विरुद्ध बाजूला पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागला आहे. स्वतः च्या बहिणीचा असा अंत झाल्याचे पाहून राजेंद्र तांबे यांनी हंबरडा फोडला. यानंतर राजेंद्र तांबे यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हा डंपर अनिल दिलीप जाधव (रा.विटा) यांच्या मालकीचा असल्याचे आरटीओच्या रेकॉर्ड वरून समजते. दरम्यान अपघातानंतर लोकांनी डंपर थांबवून चालकाला विटा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.