कडेगाव शहर : अतिशय संघर्षातून आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करत सभासद व कामगारांच्या बळावर वाटचाल करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. सहकारी तत्त्वावरील देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना होण्याचा बहुमान या कारखान्याला मिळाला असून, राज्य व देश पातळीवरील बहुतेक सर्व पुरस्कार पटकावले आहेत. कारखान्याने सातत्याने एफ.आर.पी.पेक्षा जास्त दर दिला असून, आगामी काळातही योग्य दर देण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
'लोकतीर्थ' या डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकस्थळी आयोजित सोनहिरा कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शांताराम कदम, कडेगावचे सभापती डॉ. जितेश कदम, पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे संचालक हर्षवर्धन कदम, कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी शिंदे, ज्येष्ठ नेते भीमराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांनी मागणी करण्यापूर्वीच टेंभू योजनेचे पाणी सुरू करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. कोयना धरण भरले असले तरी, यंदा पाऊस कमी झाल्याने पुढील सहा महिन्यांनंतर टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही.
ताकारी व टेंभू योजनेच्या पाणीपट्टीबाबत आपण आधीच भूमिका स्पष्ट केली होती. लाभक्षेत्राबाहेरील इतर कारखान्यांनीही पाणीपट्टी कपात करून ती संबंधित योजनांकडे जमा करणे आवश्यक होते; परंतु शासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे सोनहिरा कारखान्याने सन २०२५-२६ च्या हंगामात कपात केलेली पाणीपट्टीची रक्कम शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
सभेत कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एल. देसाई यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी गत गळीत हंगामात आडसाली, सुरू व खोडवा पिकात विक्रमी उत्पादन घेणाऱ्या गुणवंत शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सभेला सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.