आटपाडी : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने वडिलांवर चाकूने जीवघेणा हल्ला करून आईलाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली. या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
माणिक भगवान भोसले (वय ७०, रा. नेलकरंजी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण माणिक भोसले (रा. नेलकरंजी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रवीण दारूच्या नशेत हातात चाकू घेऊन घरात आला. ‘मला आणखी दारू प्यायची आहे, पैसे द्या; नाही तर तुम्हाला मारून टाकीन’, अशी धमकी त्याने आई-वडिलांना दिली. या वेळी वडिलांनी त्याला, ‘कामधंदा न करता दारूसाठी पैसे मागतोस आणि पैसे दिल्यावरही शिवीगाळ व धमक्या देतोस’, असा जाब विचारला.
याचा राग आल्याने प्रवीणने हातातील चाकूने वडिलांच्या डाव्या मनगटावर वार केला. आई पारूबाई भोसले या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता आरोपीने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान वडील खाली पडल्याचा गैरफायदा घेत आरोपीने त्यांच्या डोक्याच्या मागील भागावर चाकूने पुन्हा वार केला. कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने फिर्यादींचे भाऊ आनंदराव, विजय व भावजय शांताबाई आणि मानवता यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. पळून जाताना ‘माझ्याविरुद्ध तक्रार केली, तर परत आल्यावर तुम्हा सर्वांना जिवंत सोडणार नाही’, अशी धमकीही त्याने दिली.