सोनी ः भारत - पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आपल्या तीन महिन्यांच्या मुलाच्या बारशाचा सोहळा अर्ध्यावर सोडून सिध्देवाडी (ता. मिरज) येथील जवान रूपेश ऊर्फ बाळू शेळके हे भारताने राबविलेल्या सिंदूर मोहिमेसाठी जम्मू-काश्मीरला रवाना झाले.
आपल्या घरच्या कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्त्व देणार्या जवान रूपेश शेळकेंच्या देशप्रेमाला सिध्देवाडीच्या ग्रामस्थांनी सलाम केला. उपस्थित ग्रामस्थांनी भारतमातेच्या घोषणा देत जवान शेळके यांना पाठबळ दिले. कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी ‘आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे’ असे म्हटले होते. त्याचीच प्रचिती जवान रूपेश यांच्या कृतीतून दिसून आली.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद मोडीत काढण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम उघडली. दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने जवानांच्या सुट्या रद्द केल्या. रजेवर गेलेल्या जवानांनाही परतण्याचे आदेश दिले. गेली 10 वर्षे सैन्यदलात कार्यरत असणारे जवान रूपेश हे आपल्या तीन महिन्यांच्या बाळाच्या नामकरणासाठी एक महिन्याच्या सुटीवर सिध्देवाडी येथे आले होते. गुरुवारी त्यांच्या घरासमोर मंडप घातला होता.
पै-पाहुण्यांना व ग्रामस्थांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमास काही अवधी बाकी असतानाच रूपेश यांना भ्रमणध्वनीवर जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यासाठी हजर राहण्याचा आदेश मिळाला. आदेश मिळताच शेळके यांनी कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला. आई लक्ष्मीबाई शेळके, थोरले बंधू शिक्षक अमोल शेळके यांच्यासह उपस्थित वडीलधारी मंडळींचे आशीर्वाद घेत दोन्ही मुलेन व पत्नी रूपाली यांची भेट घेत हसतमुखाने ते देशसेवेसाठी जम्मू - काश्मीरला रवाना झाले.
जवान रूपेश यांना भ्रमणध्वनीवरून कर्तव्यावर हजर राहण्याचा आदेश मिळाला. मंडपात आनंदाचे वातावरण असताना जवान रूपेश यांनी कर्तव्यावर निघण्याचा निर्णय घेतला. उपस्थितांचे आशीर्वाद घेतले. यावेळी वातावरण भावनिक झाले. तरीही देशसेवा महत्त्वाची असल्याची जाणीव असल्याने कार्यक्रमास उपस्थित सर्वांनीच ‘भारतमाता की जय’ असा जयघोष करीत रूपेश यांना पाठबळ दिले.
माझे पती आमच्या बाळाच्या बारशासाठी सुटीवर आले होते. परंतु अचानक त्यांना तत्काळ सेवेत हजर होण्याचा आदेश प्राप्त झाला. त्यांनी कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जाण्याचे दु:ख झाले, मात्र देशसेवा महत्त्वाची असल्याने माझ्या पतीच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. स्वतःच्या बाळाच्या कार्यक्रमापेक्षा देशसेवा महत्त्वाची आहे.रूपाली रूपेश शेळके, पत्नी