बार्शी : कडबा घेऊन भरधाव वेगाने येरमाळा येथून बार्शीच्या दिशेने निघालेल्या टेम्पोने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडले. या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा जागेवरच मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील 11 महिन्याच्या चिमुकल्यासह पती, पत्नी असे तिघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी बार्शी ते येरमाळा राष्ट्रीय मार्गावर पिंपळवाडी येथे घडली.
सुरेखा गौतम चौधरी (वय 60 रा. पिंपळवाडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. विकी तानाजी चौधरी (45), अपर्णा विकी चौधरी (34) व देवा विकी चौधरी (वय 11 महिने, रा. पिंपळवाडी) अशी या अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पो क्रमांक एम एच 46 इ 3060 च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उभ्या कारला जाऊन धडकला. दरम्यान, आरोपींना अटक केल्याशिवाय व गतिरोधकाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत पिंपळवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.