Smriti Mandhana: स्मृती-पलाश... एक अधुरी प्रेमकहाणी Pudhari Photo
सांगली

Smriti Mandhana: स्मृती-पलाश... एक अधुरी प्रेमकहाणी

चर्चांना पूर्णविरामाची अपेक्षा; नात्याची कबुली ते विवाह रद्दचा असा झाला प्रवास

पुढारी वृत्तसेवा

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर खेळाडू व उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या विवाहाच्या विषयावर रविवारी अखेरचा पडदा पडला. त्यांचा 23 नोव्हेेंबरला होणारा विवाह लांबणीवर टाकला होता. आता 16 दिवसांनंतर म्हणजे रविवारी, 7 डिसेंबरला त्यांचे लग्न रद्द झाल्याची घोषणा दोघांनीही केली. त्यामुळे उलट-सुलट तर्कांना सामुदायिक शहाणपणाने पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा आहे.

स्मृती आणि पलाश 2019 पासून प्रेमसंबंधात होते. त्यांनी हा विषय अत्यंत खासगी ठेवला होता. काही महिन्यांपूर्वी स्मृतीने सोशल मीडियावर पोस्ट करत, दोघे प्रेमसंबंधात असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ते विवाहबंधनात कधी अडकणार, याचीही चर्चा सुरू होती. भारतीय महिला संघाने महिला विश्वचषक जिंकला अन्‌‍ तिने विवाहाचा निर्णय घेतला. सांगलीतील एसएम 18 या तिच्या फार्म हाऊसवर विवाहाची जय्यत तयारी झालेली. निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत विवाह पार पडणार होता. यापूर्वी पलाश याने, स्मृतीने ज्या क्रीडांगणावर विश्वचषक जिंकला, त्याच क्रीडांगणावर तिला प्रपोजही केले होते.

नंतर 21 नोव्हेंबर रोजी दोघांना एकमेकाच्या नावाची हळद लागली, 22 नोव्हेंबर रोजी दोघांच्या नावाची मेहंदी रंगली व सायंकाळी संगीत रजनीही झाली. यावेळी दोन्ही कुटुंबांनी जोरदार जल्लोष केला. त्यावेळी स्मृती आणि पलाश या दोघांनीही नृत्य केले, ते प्रचंड व्हायरलही झाले.

दरम्यान, 23 नोव्हेंबर रोजी सकाळपासून विवाहस्थळी पाहुण्यांची रेलचेल होती. दुपारी 4 वाजता विवाह होणार होता. परंतु त्यापूर्वीच दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना हृदयविकाराचा झटका आल्याची वार्ता पसरली. मंडपातूनच त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे तपासणीमध्ये त्यांना ब्लॉकेज नसल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, त्याचदिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने पलाश यालाही रुग्णालयात नेले. परंतु स्मृतीचे वडिलांवर अपार प्रेम असल्याने, त्यांची तब्येत ठीक होत नाही, तोपर्यंत विवाह करणार नाही, असा निर्णय स्मृतीने घेतला. त्यामुळे वऱ्हाड माघारी परतले.

या घटनेनंतर स्मृतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोघांचेही व्हिडीओ डिलिट केले, सर्व पोस्ट हटविल्या. महिला संघातील क्रिकेटर जेमीमा रॉड्रीग्ज, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, शेफाली वर्मा यांनीही स्मृतीच्या विवाहाशी संबंधित सर्व पोस्ट डिलिट केल्या. त्यानंतर तर्कवितर्क लढवले जाऊ लागले.

साखरपुड्याची अंगठी गायब

दरम्यान, स्मृतीने तिच्या सोशल मीडियावर एक मुलाखत पोस्ट केली होती. त्यावेळी तिच्या बोटातील साखरपुड्याची अंगठी गायब असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने आपले लग्न रद्द केल्याबाबत पोस्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT