सांगली, मिरज, कुपवाड ड्रेनेजप्रश्नी महासभा वादळी 
सांगली

Sangli News : सांगली, मिरज, कुपवाड ड्रेनेजप्रश्नी महासभा वादळी

महापौर, आयुक्त ठेकेदारावर भडकले : एमजेपीचे वाभाडे; कुपवाड ड्रेनेज ठेकेदाराला ब्लॅकलिस्टचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज तसेच कुपवाड ड्रेनेज योजनेच्या रखडलेल्या कामांवरून सोमवारी महासभा वादळी झाली. या योजनेच्या ठेकेदार कंपनीवर महापौर, उपमहापौर, आयुक्तांसह नगरसेवक भडकले. एमजेपी (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) अधिकाऱ्यांच्या कारभाराचेही वाभाडे काढले. या योजनेचा मुख्य ठेकेदार महासभेला उपस्थित नसल्याने महापौरांनी संताप व्यक्त केला. कामाचे बिल न काढण्याचे आदेश दिले. 25 रोजीच्या बैठकीला ठेकेदार उपस्थित न राहिल्यास मुदतवाढ देऊ नका, ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करा, असे निर्देशही महापौरांनी दिले.

महापौर धीरज सूर्यवंशी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. मिरज ड्रेनेज योजना, सांगली ड्रेनेज योजना एप्रिल 2013 ला सुरू झाली. कार्यारंभ आदेश देऊन 13 वर्षे झाली, तरी या दोन्ही योजना पूर्ण झालेल्या नसल्यावरून मिरजेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर केवळ 5 टक्के काम अपूर्ण असल्याचे एसएमएस इन्फास्ट्रक्चर ठाणे या ड्रेनेज ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. काही आवश्यक परवाने तसेच दीड वर्ष कामाचे पैसे मिळाले नसल्याचे ठेकेदाराने सांगितले. 90 टक्के रक्कम मिळूनही ठेकेदार पैसे मिळाले नसल्याचे कारण देत असल्यावरून नगरसेवक संतापले.

मिरज ड्रेनेज योजना टप्पा क्रमांक 2 चे 5 टक्के काम राहिले असल्याचा ठेकेदाराचा दावा नगरसेवकांनी खोडून काढला. शहर तसेच विस्तारित भागातील ड्रेनेज काम रखडल्यावरून नगरसेवक निरंजन आवटी, करण जामदार, विद्या नलवडे, दयानंद खोत, दिग्विजय सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान, मोहन वाटवे, सागर वनखंडे, बिलकिस बुजरूक, शैला दुर्वे, अपर्णा शेटे यांनी आवाज उठवला. आठवेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्यावरून संताप व्यक्त केला. नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागत असल्याकडे लक्ष वेधले. एमजेपी ही या योजनेची कार्यान्वयीन यंत्रणा आहे. त्यांना महापालिका 2.50 टक्के रक्कम देते. मात्र एमजेपीचे अधिकारीही ठेकेदाराला पाठीशी घालत आलेले आहेत, असा आरोपही नगरसेवकांनी केला. एमजेपीचे अभियंता कुलकर्णी यांना नगरसेवकांनी धारेवर धरले.

ब्लॅकलिस्ट करणार होतो, पण दबाव आल्याचा गौप्यस्फोट

मिरज ड्रेनेज योजनेचे काम अडीच महिन्यात पूर्ण होईल, असे ठेकेदाराने सांगितले. त्यावर दिग्विजय सूर्यवंशी भडकले. मी महापौर असताना चार महिन्यात काम पूर्ण होईल असे ठेकेदाराने सांगितले, पण त्यानंतर चार वर्षे झाली तरी काम अपूर्ण असल्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. चार वर्षापूर्वीच ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करणार होतो, पण वरून दबाव आल्याचा गौप्यस्फोटही सूर्यवंशी यांनी केला.

रखडलेल्या सांगली ड्रेनेज योजनेवरून दिग्विजय सूर्यवंशी, अभिजित भोसले, लक्ष्मण नवलाई , जगन्नाथ ठोकळे, अभिजित कोळी, अश्विनी कदम, युवराज बावडेकर यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. अंकली रोड तसेच उष:काल हॉस्पिटलजवळील 25 मीटर राहिलेले काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर शामरावनगरमधील हसरा चौक ते विश्रामबागपर्यंतची ड्रेनेज योजना कार्यान्वित होईल. धामणी रोडचा पूर्व भाग चालू होईल. ईदगाह मैदान परिसर वगळता सांगली ड्रेनेज योजनेचे काम 31 एप्रिलपूर्वी पूर्ण होईल, असे सांगितले. दरम्यान, वखारभाग, अजिंक्यनगर, पद्माळे रोड भागात मंगळवारी संयुक्त पाहणी करण्याचे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी दिले.

कुपवाड ड्रेनेज योजनेची मुदत संपून सहा महिने झाले, तरी बरीच कामे रखडली असल्यावरून उपमहापौर गजानन मगदूम, प्रकाश पाटील, संतोष पाटील, विष्णू माने, योगिता राठोड, प्राजक्ता धोतरे, मालुश्री खोत, रवींद्र सदामते, दीपक वायदंडे यांनी आवाज उठवला. ड्रेनेज लाईनसाठी खोदलेला रस्ता पूर्ववत केला जात नसल्यावरून चौकशीची मागणी केली. कामाच्या दर्जाचाही प्रश्न उपस्थित केला. ज्याठिकाणी प्लॉटिंगचे काम झाले आहे, त्याठिकाणचे काम प्राधान्याने केल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, ठेकेदाराचे बिल थांबवण्याची मागणी मंगेश चव्हाण यांनी केली. दरम्यान, महापालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते, ठेकेदार, एमजेपी ठेकेदार यांची 25 रोजी आयुक्तांच्या दालनात बैठक होईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले. ठेकेदार कंपनीने एका खासगी बिल्डरवर कृपा केल्याचा आरोप केला. पोलिसांची जादा कुमक घेऊन जिल्हा परिषद कॉलनी-विकास कॉलनीतील ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करा, अशी आग्रही मागणी राठोड यांनी केली. येथील अतिक्रमण काढून काम सुरू करा, असे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT